पुरावे द्या, परीक्षा रद्द करू– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ही परीक्षा राज्यात पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली. त्यात गैरव्यवहाराचा पुरावा दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल.
मुंबई-ऑगस्ट ते सप्टेंबर २०२३ दरम्यान खासगी एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेतील आश्चर्यकारक निकाल समोर आले आहेत. २०० गुणांच्या या परीक्षेचे गुणांकन नॉर्मलायझेशन पद्धतीने करण्यात आले. त्यामुळे काही उमेदवारांना २०४ ते २१४ पर्यंत गुण पडल्याचे यादीत दिसत आहे. त्यामुळे उमेदवारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, आधीच पेपरफुटीमुळे ही परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यात निकालातही घोळ स्पष्ट झाल्याने परीक्षाच रद्द करावी, यासाठी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दिला आहे. विरोधी पक्षांनीही सरकारवर टीका करत हीच मागणी लावून धरली आहे.
४७९२ तलाठी पदासाठी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत राज्यभर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. सुमारे ११ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते.
नॉर्मलायझेशन : गुण वाढू शकतात, कमीही होऊ शकतात
नॉर्मलायझेशन म्हणजे सरासरी गुण. जे संबंधित पेपरच्या काठिण्य पातळीवर अवलंबून असते. काही विद्यार्थ्यांचे गुण वाढू शकतात आणि काही विद्यार्थ्यांचे गुण कमी होऊ शकतात, परंतु परीक्षा २०० गुणांची असताना राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना त्यापेक्षा जास्त गुण कसे काय मिळू शकतात? असा प्रश्न उमेदवारांमध्ये आहे
एसआयटी चौकशी करा
२०० पैकी २१४ गुण मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आजपर्यंतच्या इतिहासातील हे एक आश्चर्य आहे. “तलाठी भरती परीक्षा’ हा मोठा घोटाळा आहे. त्याची एसआयटी चौकशी व्हावी. – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा
मास्टरमाइंड समोर आणा–आमदार कैलास पाटील
तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणात गुन्हेही दाखल झाले आहेत. प्रक्रिया पारदर्शक झाल्याचा सरकार दावा करत असेल तर गुन्हे कसे दाखल झाले? सरकारने सगळ्या चुकीची जबाबदारी घेऊन घोटाळ्यामागचा मास्टरमाइंड समोर आणावा.

