पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त लोकशिक्षणपर अभिनव कार्यक्रमाचे उद्घाटन
पुणे, : “ज्ञानेश्वरीत विश्वशांती निर्मितीचा मुलभूत विचार समाविष्ट आहे. त्यामुळे आळंदी हेच विश्वातील एकमेव विश्वशांती केंद्र आहे. जो पर्यंत मानवाला अध्यात्माची जाणिव होणार नाही तो पर्यंत शांतीचा विचार ही करता येणार नाही. डॉ. कराड यांनी आळंदीत केवळ घाटच बांधले नाही तर त्यांनी मानव बांधण्याचे कार्य केले आहे.” असे विचार परभणी येथील ह.भ.प.डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणेकर यांनी व्यक्त केेले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच, बाळासाहेब काशिद, भालचंद्र नलावडे, माजी नगरसेवक सुरेश काका वडगावकर, नंदकुमार वडगावकर, हभप तुळशीराम दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, डॉ. सुदाम महाराज पानेगावकर व विठ्ठल काळेखे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ह.भ.प.डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणेकर म्हणाले,“ कलियुगाच्या काळात विकास म्हंटल की बांधकाम येत. परंतू या विकासाबरोबर विश्वशांती केंद्राचा विकास होत आहे. डॉ. कराड यांनी ज्ञानोबा-तुकोबाचे कार्य समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत आहेत. अद्वैत भक्तीत विश्व मानवाचा विचार सामावलेला आहे. आत्मज्ञान व कर्मयोग सुदृढ करावयाचा असेल तर आध्यात्म महत्वाचा आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ ज्ञान, भक्ती आणि कर्म ही परंपरा वारकरी सांप्रदायाची आहे. सद्गुणांची पूजा हीच खरी ईश्वर पूजा हे व्रत घेऊन या क्षणापर्यंत कार्य करीत आहे. मी निमित्तमात्र असून माऊली माझ्याकडून आज ही कार्य करून घेत आहेत. भविष्यात वारकरी सांप्रदायच जगाला सुख समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. हा मार्ग तीर्थ क्षेत्राकडून ज्ञान तीर्थ क्षेत्राकडे जाण्याचा आहे. आज अक्कांच्या आशीर्वादाने चायना बॉर्डरवर सरस्वती मंदिर उभे राहिले आहे. वारकर्यांच्या पाई पाई ने बनलेल्या या घाटाची निर्मिती झाली आहे. त्यांचे ज्या पद्धतीने विद्रुपीकरण होत आहे ते चांगले नाही. परंतू जगाच्या नकाशावर आळंदी आणि देहू आहे. अशावेळेस आळंदी, देहू आणि पंढरपूला डाग लागू नये. ”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,“ जाती-पातीमध्ये विभागलेल्या लोकांना एकत्रित करण्याचे व त्यांच्यात अस्मिता निर्मितीचे कार्य संत ज्ञानेश्वर माऊली यांनी केले आहे. ते देशातील सर्वात मोठे समाज सुधारक आहेत. त्यांनी संपूर्ण समाज सुधारला आहे. वारकरी म्हणजे सज्जनांची मंदियाळी, ज्या गावात वारकरी आहे ते गाव सुखी आहे.
बाळासाहेब काशिद म्हणाले,“ ज्ञानोबा व तुकारामाचे कार्य जगभर पोहोचविण्याचे मोलाचे कार्य डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले. १८ पगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन ते शांतीचे कार्य करीत आहेत. तसेच मानव शांतीसाठी डॉ. कराड यांनी जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती केली आहे.”
डॉ. विश्वनाथ कराड यांनी वारकर्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती विठ्ठलराव काळोखे व हभप डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर यांनी दिली.
हभप महेश महाराज नलावडे यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन हभप शालिकराम खंदारे यांनी केले.

