मुंबई : काही प्रसार माध्यमे व समाजमाध्यमांवर मुंबई पोलीस दलातील महिला शिपाई यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे वृत्त प्रदर्शित झाले. या प्रकरणी सखोल माहिती घेण्यात आली. याप्रकरणी तथाकथित अर्जदारांकडे चौकशी केली असता असा अर्ज त्यांनी केला नसून त्याचे नाव व सही कुणीतरी अज्ञात माणसाने खोडसाळपणे वापर केल्याचे समजून आले आहे. ही माहिती पूर्णपणे चुकीची असून काही समाजकंटकांनी जाणीपूर्वक सदरचे कृत्य केले असल्याचे समजून आले आहे.
या अर्जामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसून खोडसाळपणाने अर्ज करण्याऱ्याचा शोध घेऊन त्याच्याविरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे, असे स्पष्टीकरण मुंबई पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी केले आहे.
काय होती ती बातमी—
8 महिला पोलिसांवर,अधिकारी साहेबाच्या बंगल्यावर अत्याचार,दारूच्या नशेत व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यासाठी धमकी –
मुंबई पोलिसांच्या नागपाडा वाहतूक विभागातील आठ महिला वाहनचालकांनी पोलिसांच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बलात्काराचे आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करून त्यांनी या अत्याचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, खळबळ उडवून दिली आहे.
पीडित महिला पोलिसांनी पत्रात लिहिले की, ‘आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातील आहोत. आमचे आई, वडील हे गरीब शेतकरी आहेत. काही मैत्रिणींचे आई, वडील मृत झालेले आहेत. म्हणून आम्ही चांगल्या नोकरीच्या आशेने गावाहून मुंबईत आलो व पोलिस खात्यात भरती झालो आहे. सध्या आम्ही नागपाडा मोटार परिवहन विभाग येथे चालक म्हणून कार्यरत आहोत.परिचलन कक्षातील पोलिस निरीक्षक अविनाश हराळ व प्रभारी इन्चार्ज सीताराम खांडे व तेथील लेखनिक या तिघांनी नोव्हेंबरपासून आमचे मानसिक व लैंगिक शोषण सुरू केेले आहे. पोलिस उपअधीक्षक बढे यांच्या सरकारी वाहनातून व त्यांच्याच सरकारी निवासस्थानी हराळ व खरे आम्हाला घेऊन गेले होते. तिथे या तिघांनी आमच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
‘आम्ही मुंबईला आमच्या बायका- मुलांना साेडून एकटेच राहत असतो. जर तुम्ही आमच्याशी शारीरिक संबंध ठेवले तर आम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये काहीच काम देणार नाही’, असे ते आम्हाला सांगायचे. इतकेच नव्हे तर हराळ व खरे यांनी आमचे अश्लील व्हिडिओ बनवले. त्याआधारे आम्हाला वारंवार ब्लॅकमेल करीत आहेत. रोज रात्री दारू पिऊन आम्हाला अश्लील मेसेजेस व व्हिडिओ पाठवत असतात. कधी कधी आम्हाला विवस्त्र होऊन व्हिडिओ कॉल करण्यासाठी ब्लॅकमेल करतात. तसे न केल्यास बढे साहेबांना सांगून तुमची बदली करीन, अशा धमक्याही देतात.सामूहिक बलात्कारामुळे महिला पोलिस कर्मचारी गरोदर राहिल्या. त्यानंतर तिला सात हजार रुपये देऊन गर्भपात करण्यास सांगण्यात आले. याबद्दल आम्ही वरिष्ठांकडे आवाज उठवला असता आम्हाला निलंबित करण्याची धमकीही देण्यात अाली, असेही एका महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

