पुणे – पुण्याहून भोरमार्गे कोकणात, विशेषतः महाडकडे जाणाऱ्या वरंधा घाट मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीसाठी वरंधा घाट मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, हवामान खात्याच्या रेड आणि ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर, मुसळधार पावसाच्या दिवसांत हलक्या वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूकही बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पावसाळ्यात वरंधा घाटात दरवर्षी दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, रस्ते खचणे आणि माती वाहून जाणे अशा घटना घडतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि अपघातांची शक्यता वाढते. यंदा घाट रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला असून, वाहनधारकांसाठी धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले असून, नागरिकांनी प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

