
सांगली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वसंतदादा पाटील यांच्या नातसून तसेच काँग्रेस महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा आणि प्रभावी नेत्या जयश्री पाटील आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. सांगलीच्या राजकारणात हा मोठा भूकंप मानला जात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपच्या विजयाच्या गणितात महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
जयश्री पाटील या दिवंगत मंत्री मदन पाटील यांची पत्नी आहेत. मदन पाटील हे काँग्रेसचे प्रभावशाली नेते होते. तसेच त्या वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील आहेत. पाटील घराण्याचा महाराष्ट्रात साठ‑सत्तरच्या दशकात मोठा राजकीय दबदबा होता. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदावर त्यांनी यशस्वी काम केले आहे. ज्यामुळे त्या स्थानिक स्तरावर सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. त्यांचे माहेर ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना सांगलीसाठी उमेदवारी दिली नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि बंडखोरी केली. या बंडासाठी काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचे मन वळवता आले नाही. किंवा काँग्रेसने त्यासाठी फारसे प्रयत्न केले नसल्याचेही बोलले जात आहे. मात्र, आता हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
जयश्री पाटील या गेली दोन दशके काँग्रेसमध्ये सक्रीय होत्या. महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात बळकट संपर्क साधला होता. त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेस पक्षासाठी त्या प्रभावशाली वक्त्या, संघटक आणि महिला मतदारांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखल्या जात होत्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून जयश्री पाटील या काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे नाराज होत्या. अनेक वेळा त्यांनी पक्षश्रेष्ठींना कार्य पद्धतीतील त्रुटींविषयी सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्या मतांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही. त्यामुळे देखील त्या नाराज होत्या. त्याच वेळी, भाजपकडून त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यात आला होता. भाजपकडून सांगली जिल्ह्यात महिला नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांचा प्रवेश भाजपसाठी मोठी संधी आहे.गेल्या काही वर्षांपासून भाजपने महिला मतदारांमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देणे, स्थानिक महिला नेतृत्वाला संधी देणे आणि सामाजिक योजनांच्या माध्यमातून संवाद वाढवणे याचा समावेश आहे. जयश्री पाटील यांचा प्रवेश या धोरणाला बळकटी देणारा आहे.

