पुणे : शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टने मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून हटवल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावरून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आवाज उठवला असून, याला थेट धर्मभेद ठरवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. शनिशिंगणापूर देवस्थानने आधी लिंगभेद आणि आता धर्मभेद केला असे म्हणत तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. ही केवळ धार्मिक भावना दुखावणारी कृती नाही, तर संविधानाच्या मूल्यांनाही काळिमा फासणारी असल्याचेही त्या म्हणाल्या. शिवाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावरही निशाणा साधला.अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये मुस्लिम कर्मचारी नोकरीला होते. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये एकून 114 मुस्लिम कर्मचारी नोकरीला होते. त्यांच्याविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या. ट्रस्टने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून काढून टाकावे, अशी मागणी भाजप आध्यत्मिक आघाडी सह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप हे आघाडीवर होते. हे कर्मचारी जर देवस्थान ट्रस्टने काढून टाकले नाही तर त्यांच्या विरोधात मोठ आंदोलन उभारण्याचा इशारा या संघटनेने दिला होता.या आंदोलनाचा धसका घेत देवस्थान ट्रस्ट 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह इतर 167 कर्मचाऱ्यांना कामात अनियमितता असल्याचं कारण देत रात्रीत नारळ दिलं. सुरुवातीला शनिशिंगणापूर देवस्थानच्या चौथ्यावर महिलांना बंदी असल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. लिंगभेद करणाऱ्या या देवस्थान ट्रस्टच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मोठ आंदोलन उभारलं होतं. तृप्ती देसाई यांच्या आंदोलनानंतर देवस्थाने आपला निर्णय मागे घेत चौथर्यावर महिलांना पूजा करण्यास परवानगी दिली याची इतिहासात नोंद झाली .‘
नेमक्या काय म्हणाल्या तृप्ती देसाई?
शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टने आधी लिंगभेद केला. आम्हाला त्या विरोधात आंदोलन कराव लागले. स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान अधिकार आहेत, या दोघांनाही शनिशिंगणापूर देवस्थानाच्या चौथऱ्यावर पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी आम्हाला आंदोलन कराव लागले आणि ते आंदोलन यशस्वी झाले. आधी लिंगभेद केला आणि आता धर्मभेद केला जात आहे. जे मुस्लिम कर्मचारी आहेत, त्यांनी हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये साफसफाई केली नाही पाहिजे, अशी मागणी काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांची होती. त्यांना घाबरून विश्वस्त मंडळाने 167 कर्मचारी कामावरून काढले. त्यापैकी 114 कर्मचारी हे मुस्लिम आहेत. या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतले पाहिजे, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली.
ट्रस्टने दिलेले अनियमिततेचे कारण धादांत खोटे आहे. जर मुस्लिम धर्मातील काही लोक शनिशिंगणापूर या ठिकाणी सेवा करत असतील, तर हे खूप मोठे चांगले उदाहरण आहे. हिंदू धर्म हा सर्वसमावेशक आहे. उद्या मुस्लिम दर्ग्यामध्ये हिंदू धर्माचे लोक घेतले जात नाहीत, हे म्हणण्यापेक्षा आमच्या हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये सगळ्या धर्माच्या कर्मचाऱ्यांना संधी दिली जाते, अशा पद्धतीचा स्टॅंड घेणे गरजेचे आहे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
अजितदादा संग्राम जगतापला आवर घाला
तृप्ती देसाई यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावरही आगपखाड केली. संग्राम जगताप हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. अजितदादा वारंवार सांगतात मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आहे. जर अजित पवारांचे विचार फुले शाहू आंबेडकरांचे असतील, तर त्यांचा एक आमदार वारंवार व्हिडिओ टाकत आहे, धमक्या देत आहेत. वारंवार सांगतात की, आम्ही मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकू आता शिर्डीत जाऊन सुद्धा हेच करू. अजितदादा तुम्ही या संग्राम जगतापला आवर घाला. तुमची जी विचारसरणी आहे त्याचाच अपमान करण्याचे काम हे संग्राम जगताप करत आहेत, असे देसाई म्हणाल्या.
धर्मादाय आयुक्त, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
कुठल्याही जाती धर्माचे कर्मचारी असतात. त्यांना बेरोजगार करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. यापेक्षा संग्राम जगताप यांनी शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये जे बनावट ऍप प्रकरण झाले, ते उचलून धरावे, असा सल्ला तृप्ती देसाई यांनी संग्राम जगतापांना दिला.तसेच यासंदर्भात देवस्थान ट्रस्टची तक्रार मी धर्मादाय आयुक्तांकडे करणार आहे, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा या संदर्भात लक्ष घालण्याचे सांगून जे कर्मचारी काढून टाकले आहेत त्यांना पुन्हा रुजू करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे देसाई यांनी म्हटले आहे.
नेमके प्रकरण काय?
अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये मुस्लिम कर्मचारी नोकरीला होते. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये एकून 114 मुस्लिम कर्मचारी नोकरीला होते. त्यांच्याविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या. ट्रस्टने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून काढून टाकावे, अशी मागणी भाजप आध्यत्मिक आघाडी सह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप हे आघाडीवर होते. हे कर्मचारी जर देवस्थान ट्रस्टने काढून टाकले नाही तर त्यांच्या विरोधात मोठ आंदोलन उभारण्याचा इशारा या संघटनेने दिला होता. या दबावामुळेच देवस्थान ट्रस्टने कामात अनियमितता असल्याचे कारण दाखवत 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह इतर 167 कर्मचाऱ्यांना रात्रीतून कामावरून काढले.

