पुणे-बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगल्या प्रकरणी सराईत दाेन आराेपींना पोलिसांनी कात्रज घाट परिसरात अटक केली असून त्यांचा एक अल्पवयीन साथीदार ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित आराेपी यांच्याकडून देशी बनावटीचे तीन पिस्तुले, दोन रिकाम्या मॅगझीन, नऊ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अनिकेत संजय मालपोटे (वय -२२, रा. सुतारदरा, कोथरूड,पुणे), निखील मुकेश तुसाम (वय -१९, रा. केळेवाडी, कोथरूड,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन अाराेपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अाराेपी विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कात्रज घाट परिसरात जगजीत इंजिनिअरिंग श्री लक्ष्मी गॅरेजजवळ दुचाकीस्वार मालपोटे, तुसाम आणि अल्पवयीन साथीदार संशयितरित्या थांबलेले असून, ते गंभीर गु्न्हा करण्याच्या तयारीत आहे. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा देखील असल्याची माहिती पाेलीस तपास पथकाला मिळाली हाेती. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस शिपाई कृष्णा म्हस्के, सौरभ साळवे यांनी ही कामगिरी केली.
मालपोटे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विराेधात गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहे. त्याने पिस्तूल नेमके कोठून आणले, तसेच त्याने पिस्तूल का बाळगले, यादृष्टीने पाेलीसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडीत सुनावली अाहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश माेकाशी याबाबत पुढील तपास करत आहेत.

