पुणे-मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे दोन दिवसांपूर्वी धोकादायक पूल कोसळण्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेतील जखमी रुग्णाची राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पवना हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक आमदार सुनील शेळके व अधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना रविवारी दुपारी घडली. त्यात चार लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 40 ते 45 पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते. त्यांना वाचवण्यात यश आले. सुमारे 38 जण जखमी झाले होते. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जखमींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.जखमींची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. घटना घडल्यानंतर काही मिनिटांतच वेगवेगळ्या शासकीय यंत्रणा हलवण्यात आल्या आणि तिथे लोकांना कशा प्रकारे वाचवता येईल, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आला. आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह इतर विभागांच्या टीमने यामध्ये जलद गतीने सगळ्या गोष्टी केल्यामुळे अनेकांना या संकटातून बाहेर काढू शकलो. अनेकांचा जीव वाचवू शकलो. परंतु, दुर्दैवाने चार जणांना प्राण गमवावे लागले, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी यावेळी जखमींवरील उपचाराबाबत माहिती दिली. आयसीयूमध्ये 8 वेगवेगळ्या नागरिकांवर उपचार सुरू आहेत. जनरल वॉर्डात 8 जणांवर उपचार सुरू आहेत. जवळपास 33 जणांना रुग्णालयांतून सुटी देण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या 4 जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत. सध्या रुग्ण्यालया उपचार सुरू असलेल्या जखमींशी आम्ही बोललो. राज्य सरकारच्या वतीने ज्या काही गोष्टी जाहीर करण्यात आलेल्या आहेत, त्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
कुंडमळा येथील घटनेची आजच्या मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली. राज्यातील धोक्याचे पूल, लोकांना वापरण्यायोग्य नसलेल्या पुलांवर बोर्ड लावण्यापेक्षा काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली. बोर्ड लावल्यानंतरही काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यावर कुणी लक्ष देत नाहीत. बोर्ड बाजूला फेकून देतात. प्रशासनाचे कुणी ऐकत नाहीत. त्यामुळे धोकादायक पूल काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, कुंडमळा येथील दुर्घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील धोकादायक लहान पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील गावे आणि वाड्यांना जोडणारे लहान पूल तोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. तसेच यापूर्वी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणेने केलेल्या ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र गुड्डी यांनी दिले आहेत.

