पुणे: रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेतर्फे विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांना पहिला ‘वोकेशनल एक्सलन्स अवार्ड’ प्रदान करण्यात आला. प्रसंगी सौ. मीनल रंजनकर, ‘रोटरी’चे नियोजित प्रांतपाल संतोष मराठे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष कमलेश कार्ले, माजी अध्यक्ष दिपक शहा, व्होकेशनल डायरेक्टर संजय अडसूळ, प्रमोद दराडे, समितीचे विश्वस्त, कार्यकर्ते, मुख्य विकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, मुख्य कार्यपालन अधिकारी दुर्गेश पवार, रोटरी क्लबचे सदस्य आदी उपस्थित होते.
तुषार रंजनकर म्हणाले, “रोटरी क्लबतर्फे मिळालेला ‘व्होकेशनल एक्सलन्स’ हा पुरस्कार भारावणारा आहे. माझ्या जडणघडणीत समितीचा मोलाचा वाटा असून, मित्र परिवार, कुटुंबियांचे संपूर्ण सहकार्य मिळाल्यामुळे काही विधायक कामे करू शकलो. समितीच्या कार्याला, सहकाऱ्यांना व समितीशी संबंधित कार्यकर्त्यांना हा पुरस्कार समर्पित करतो. व्यक्तिमत्व विकास साधून संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे समितीचे ध्येय आहे. समिती, अल्फाबाईट संस्थेमार्फत होत असलेल्या कार्याची ही पोचपावती आहे.”
संतोष मराठे म्हणाले, “समितीचे संस्थापक अच्युतराव आपटे आणि माझ्या वडिलांचे स्नेहाचे संबंध होते. या ऋणानुबंधांना पुन्हा उजाळा मिळाला. रोटरी क्लब गेल्या १०० वर्षांपासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करत आहे. समाजासाठी झटणाऱ्या आदर्श व्यक्तींचा सन्मान करून इतरांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने ‘रोटरी’च्या वतीने दिले जाणारे पुरस्कार महत्वपूर्ण ठरतात.”
कमलेश कार्ले म्हणाले, “ग्रामीण भागातून पुण्यात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्यात तुषार रंजनकर यांनी गेल्या तीस वर्षांपासून स्वत:ला वाहून घेतले आहे. शिक्षण, सामाजिक कार्यात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे.” प्रमोद दराडे यांनी आभार मानले.

