पुणे: धानोरी ते चऱ्होली या डी. पी. रस्त्यासाठी आवश्यक असलेली वनविभागाची परवानगी अखेर मंजूर झाली असून, या प्रस्तावास मान्यता मिळाल्यामुळे आता रस्त्याच्या कामाला अधिक वेग येणार आहे. वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
धानोरी ते चऱ्होली या दोन गावांना जोडणाऱ्या नियोजित रस्त्यासाठी सुमारे ३०० मीटर लांब व २४ मीटर रुंद अशा एकूण ०.७३९२ हेक्टर इतकी वन विभागाच्या हद्दीतील जागा आवश्यक होती. मात्र, संबंधित वन जमिनीबाबत परवानगी प्राप्त न झाल्यामुळे हा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.
या संदर्भात आमदार पठारे यांनी वेळोवेळी महाराष्ट्र राज्य वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन सदर डी. पी. रस्त्याच्या अडथळ्यांची माहिती दिली होती. तसेच अधिकृत निवेदनदेखील सादर केले होते. धानोरी सर्वे नंबर ५ ते चऱ्होली हद्द दरम्यानचा रस्त्याचा काही भाग वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्या भागासाठी ना-हरकत प्रमाणपत्राची गरज होती.
वन विभागाकडून सदर रस्त्यासाठी आवश्यक जागेस परवानगी प्राप्त झाल्याने या रस्त्याच्या उभारणीस मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे धानोरी, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, कळस, येरवडा, लोहगाव व चऱ्होली तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होणार असून दोन्ही शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. सदर रस्त्यामुळे वाहतूक सुलभ होईल, वेळ व इंधन वाचेल. तसेच नागरी व औद्योगिक विकासालाही चालना मिळेल.
सध्या पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर याची मोठी गरज होती. या पार्श्वभूमीवर आता मंजुरी मिळाल्यामुळे पुणे महानगरपालिकेला रस्त्याचे काम विनाअडथळा पूर्ण करता येणार आहे.
“हा रस्ता गेल्या अनेक वर्ष प्रलंबित असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती, ती आता दूर होणार आहे आणि गणेश नाईक साहेब यांना धन्यवाद तसेच आमदार महेश लांडगे यांनीही त्यांच्या मतदारसंघातील भागासंदर्भात विशेष पाठपुरावा केला”, अशा भावना आमदार बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केल्या.
लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यापासून आमदार बापूसाहेब पठारे वडगावशेरी मतदारसंघातील विकासाच्या दृष्टीने सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यशैलीची व प्रामाणिक प्रयत्नांची सर्वत्र दखल घेतली जात आहे. नागरिकांच्या गरजांवर आधारित ठोस मागण्या मांडणे, शासनदरबारी त्या प्रभावीपणे मांडून त्यासाठी निधी व मंजुरी मिळवणे, प्रत्यक्षात काम सुरू होईपर्यंत पाठपुरावा करणे, हा त्यांचा कार्यपद्धतीचा भाग आहे. त्यांच्या या कामांचे नागरिक देखील मनापासून कौतुक करत आहेत. मतदारसंघासाठी एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी मिळाल्याचे समाधान नागरिक व्यक्त करत आहेत.

