
पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेमध्ये शाळा सुशोभीत करून तसेच खाऊ देऊन नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या गणेश सभागृहामध्ये या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुवर्णा बोरकर यांनी ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविक विकास पढेर यांनी केले. योगेश पाटील यांनी शाळेबद्दलची चित्रफीत दाखवून विद्यार्थ्यांना शाळेची माहिती करून दिली. शालेय पदाधिकाऱ्यांचा आणि शिक्षकांचा परिचय मनीषा जाधव यांनी करून दिला. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपामध्ये शालेय क्रमिक पुस्तकांचे वाटप मुख्याध्यापिका सुनीता राव यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करून आदर्श मनुष्य घडवण्यासाठी शाळा कशा प्रकारे प्रयत्न करते याबद्दल विचार सुनीता राव यांनी मनोगतामध्ये मांडले. या कार्यक्रमामध्ये इयत्ता सहावी मधील निखिल भुजबळ याने याच शाळेमध्ये प्रवेश घेण्याची पूर्वीपासूनची इच्छा होती, अशी भावना व्यक्त केली. पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील उपक्रमांमध्ये तसेच खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकांनी विद्यार्थ्यांना केले. क्रमिक पुस्तकांच्या वाटपाची व्यवस्था काशीनाथ घोडे यांनी पाहिली. सर्वांचे आभार गीतांजली जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी देविदास झोडगे यांनी केले. स्टेज सजावट डॉ. रूपाली माळी यांनी केली. या कार्यक्रमाची छायाचित्रण व्यवस्था डाॅ. अरुण डेंगळे यांनी पाहिली. कार्यक्रमास पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार उपस्थित होते*

न्या. रानडे बालक मंदिर
शाळेचा पहिल्या दिवशी छोटा व मोठ्या गटाचे स्वागत केले. मुलांचे स्वागत फुलांच्या माळा, तोरणे, फुगे, रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या इत्यादीने केले. तसेच प्ले ग्रुप व मिनी केजी मुलांसाठी शाळेतील पालक व शिक्षणविवेक मार्फत पपेट शो सादरीकरण केले.जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ होतो.

मुरलीधर लोहिया पूर्व प्राथमिक शाळा
मुलांना शाळेची गोडी लागावी. त्यांचा शाळेचा पहिला दिवस कायम आठवणीत रहावा म्हणून टिळक रोडवरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीची मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत नाविन्यपूर्ण मुलांचे स्वागत केले शिक्षिकांनी ढोल, लेझीमचा गजर केला. शाळेतील काही मुले डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर, आपटे आणि शाहू महाराज यांच्या वेशभुषेत आली होती. शाळेच्या आवारात सौ.निशा जोशी यांनी मंत्रोच्चारात अग्निहोत्र केले. शाळा पुर्ण सजविण्यात आली होती. प्रत्येक वर्गात मुलांना अष्टगंध लावून त्यांचे औक्षण करण्यात आले. बालगीते लावून त्यांचे स्वागत केले. मुलांनी आपल्या पालकांसोबत अग्निहोत्र आणि सरस्वतीचा आशिर्वाद घेतला. शाळेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री ठकार आवर्जून उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी मुलांचे, पालकांचे स्वागत केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा पहिला दिवस उत्साहात, आनंदात पार पडला.

एन्. ई. एम्. एस् शाळेचा पहिला दिवस -विद्यार्थ्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत…..
तब्बल दीड महिन्याच्या सुट्टीनंतर आज पासून सकाळ व दुपार सत्रातील विद्यार्थ्यांनी शाळेचा श्री गणेशा केला. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची हुरहुर होती. आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी याकरिता विद्यार्थ्यांचे औक्षण करून सनईच्या मंजुळ नादातून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीला वंदन करून सरस्वतीचा आणि सर्व शिक्षकांचा आशीर्वाद घेऊन नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ केला.
यावेळी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख उपस्थित होत्या.

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत प्रवेशोत्सव:
वाचन प्रेरणा देण्यासाठी गोष्टीचे पुस्तक देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
सोमवार दिनांक १६ जून २०२५ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या आरंभी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठीप्रवेशद्वार रांगोळ्या व फुलमाळांनी सजवले होते. इयत्ता पाचवीच्या नवप्रविष्ट विद्यार्थ्यांना शासनाच्या डायटच्या अधिकारी श्रीमती वसुधा शिंदे यांच्या हस्ते नवीन पाठ्यपुस्तकांचे संच देण्यात आले.शालाप्रमुख मा.श्रीम.चारुता प्रभुदेसाई यांनी प्रास्ताविकातून शाळेत विविध विषयांचे अध्ययन कशासाठी करायचे याची माहिती स्वरचित गीत गायनातून विद्यार्थ्यांना दिली व ते गीत विद्यार्थ्यांकडून गाऊन घेतले. मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांनी लिहिलेल्या ‘चंदर आणि इतर कथा ‘ या गोष्टीच्या पुस्तकाचे प्रकाशन या निमित्ताने करण्यात आले. शालासमिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर व प्रमुख अतिथी प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री.विजय देवळणकर यांच्या हस्ते बाल विद्यार्थ्यांच्या समावेत हे पुस्तक प्रकाशन करण्यात आले.या पुस्तकातील चंदर या गोष्टीचे कथन रवींद्र सातपुते यांनी केले.पाचवीतील विद्यार्थी अबीर पाटणकर याने या पुस्तकाचे परीक्षण सादर केले.विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमास पर्यवेक्षक मंजुषा शेलूकर व अंजली गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.उपमुख्याध्यापक जयंत टोले यांनी उपस्थितांचे आभार मानले तर रवींद्र सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.


