मुंबई-राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता अखेर संपली आहे. दोन दिवसांपूर्वी नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज 16 जून रोजी एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत 22 विद्यार्थ्यांनी 100 टक्के म्हणजेच परिपूर्ण पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटासाठी हा निकाल जाहीर असून cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटाचा निकाल उद्या 17 जून रोजी जाहीर केला जाईल .
बारावी नंतरच्या शिक्षणासाठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याच्या दृष्टीने एमएचटी-सीईटी ही राज्य सरकारमार्फत घेतली जाणारी एक महत्त्वाची परीक्षा आहे. विज्ञान शाखेतून अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा प्रवेशद्वाराचे काम करते. यशस्वी विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे.
असा पाहा सीईटीचा निकाल
अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्या .
होम पेजवर, PCM ग्रुपसाठी निकाल लिंकवर क्लिक करा.
तुमचा नोंदणीकृत ईमेल आयडी, पासवर्ड टाकून लॉगिन करा.
तुमचा निकाल तपासा आणि डाउनलोड करा.
पीसीबी गटासाठी 9 एप्रिल ते 17 एप्रिल 2025 आणि पीसीएम गटासाठी 19 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. पीसीबी गटात एकूण 3 लाख 1 हजार 72 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 82 हजार 737 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 22 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण प्राप्त करून आपल्या स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
पीसीएम गटासाठी 4 लाख 64 हजार 263 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 4 लाख 22 हजार परीक्षेसाठी उपस्थित होते. पीसीबी गटासाठी 18 मे रोजी आणि पीसीएम गटासाठी 21 मे रोजी उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली.
पीसीबी निकाल कधी जाहीर होईल?
एमएचटी-सीईटीच्या PCB (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) गटातील विद्यार्थ्यांना मात्र अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या गटाचा निकाल उद्या, म्हणजेच मंगळवारी 17 जून रोजी जाहीर होणार असून, तोही cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर पाहता येणार आहे

