मुंबई-रिलायन्स उद्योग समुहाच्या माध्यमातून जगभरात भारताचा मान उंचावणारे दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याविषयी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त विधान केले आहे. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरी करून कोट्यधीश झाले, असे ते म्हणालेत, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. सोबतच त्यांनी अजित पवारांच्या विधानाचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांना खोचक टोला हाणला आहे. त्या म्हणतात, ‘धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले आणि तुम्ही?’ असा सवाल त्यांनी यासंबंधी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार धीरूभाई अंबानी यांना चोर म्हणाल्याचा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे. अजित पवार ‘चोरून’ नव्हे तर ‘सोडून’ म्हणाले, असे ते म्हणालेत.अजित पवार पेट्रोल सोडून म्हणाले कि पेट्रोल चोरून म्हणाले यावरून आता राजकारणात रंग भरत आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची येत्या 22 जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार दंड थोपटून उतरलेत. त्यांनी ब वर्ग सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी या निवडणुकीच्या प्रचारात पाहुणेवाडी येथे आयोजित एका सभेत धीरूभाई अंबानी यांच्याविषयी एक विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तोच व्हिडिओ अंजली दमानिया यांनी पोस्ट केला आहे.
अजित पवार काय म्हणाले व्हिडिओत?
अजित पवार आपल्या व्हिडिओत म्हणतात, धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून म्हणाले कि सोडून म्हणाले ..कोट्यधीश झाले. मला सहकार टीकवायचे नसते, तर मी पेट्रोल पंप काढले असते का? काही का होईना, माझ्या गोरगरिबांची मुले तिथे लागली ना कामाला. पंपावर काम करणे कमीपणाचे नाही. पंपावरच पेट्रोल चोरी करून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले. त्यामुळे पडेल ते काम करण्याची तयारी असली पाहिजे. मिळेल त्या कामातून आपण सोने तयार केले पाहिजे.मी सहकार मोडायला निघालो असतो, तर मी संस्था मोठ्या केल्या असत्या का? माझा खासगी कारखाना काढण्याची तयारी नव्हती. सरकारने बंधने घातली. पण आम्ही आमचे कारखाने कुणाला चालवायला दिले नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाल्या अंजली दमानिया?
अजित पवार यांनी हे विधान उपस्थितांना कामाचे महत्व पटवून देण्यासंबंधी केले. पण त्यावरून आता सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चांगलाच वाद रंगला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांना त्यांनी केलेल्या घोटाळ्यांची आठवण करून दिली आहे. धीरूभाई अंबानी पंपावर पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले आणि तुम्ही? सिंचन घोटाळा, एमएससीबी घोटाळा करून आपण काय केलेत? असे प्रश्न दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये केलेत.

