- कलिंगा कला केंद्र ट्रस्टतर्फे ओडिशाच्या पारंपरिक रजस्वला महोत्सवात मासिक पाळी जागृती व मातृत्वाचा सन्मान

पुणे: ‘बनस्ते डाकीला गजा, बरसके थरे आसीची रज’ यावरील ओडिशाचा पारंपरिक नृत्याविष्कार, ‘रंगबती’ लोकनृत्य, एकाच मंचावर सादर झालेल्या भरतनाट्यम, ओडिशी, गौडियो, कथकली, कथ्थक, कुचिपुडी, मोहिनीअट्टम, मणिपुरी, सात्रीया अशा वैविध्यपूर्ण, मनमोहक नृत्य नवरत्न कार्यक्रमातून रज महोत्सव सजला. नृत्यांतून उमटलेल्या ह्रदयस्पर्शी भावमुद्रा, नजाकत अन् अभिनयाने उपस्थितांची वाहवा मिळवली. मासिक पाळी आरोग्याबाबत जनजागृती आणि मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी कलिंगा कला केंद्र ट्रस्टतर्फे ओडिशाच्या पारंपरिक ‘रज महोत्सव २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित महोत्सवात भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडले. नृत्यांगना व गायिका, कलिंगा कला केंद्र ट्रस्टच्या संस्थापक डॉ. ममता मिश्रा, ट्रस्टचे अध्यक्ष व आयपीएस संजीब पटजोशी, महासचिव संदीप राणा, सोंदिपा राणा, सुब्रकांता मोहंती, हिरकणी सोशल फाउंडेशनच्या सीईओ पूर्णिमा लुनावत, नृत्यांगना स्वागतिका मोहापात्र, अनुपमा सेन, मीनाक्षी पुलगावकर, प्रायोजक लीना मोदी, उद्योजक अतुल गुंजाळ, अरविंद बुधानी, ट्रस्टच्या सहसचिव पौलमी चॅटर्जी, खजिनदार लोकनाथ सारंगी, सदस्य निक्षिता सारंगी यांची विशेष उपस्थिती होती. वेगवेगळ्या राज्यांच्या पारंपरिक नृत्याचे मिश्रण असलेल्या नृत्य नवरत्न या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. ओडिशा सरकारच्या ओडिया लँग्वेज लिटरेचर अँड कल्चरल डिपार्टमेंटच्या सहकार्याने हा महोत्सव पार पडला.

‘बनस्ते डाकीला गजा, बरसके थरे आसीची रज’ या सामूहिक नृत्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. डॉ. ममता मिश्रा, स्वागतिका महापात्रा, रश्मीता प्रसाद, स्मिता दास, अरुणिमा मोहंती, ओडिशी नृत्यांगना मधुमिता मिश्रा यांच्या शिष्यांनी डोळ्याचे पारणे फेडणारे सादरीकरण केले. नृत्य नवरत्न या कार्यक्रमात पुजायिता भट्टाचार्य (ओडिशाचे ओडिशी), पौलोमी साखळकर (पश्चिम बंगालचे गौडीयो), सुजा दिनकर (केरळचे मोहिनीअट्टम), धनिया मेनन (आंध्रप्रदेशचे कुचिपुडी), मौसमी रॉय-देव (उत्तरप्रदेशचे कथक), पारोमिता मुखर्जी (केरळचे कथकली), सुमना चॅटर्जी (मणिपूरचे मणिपुरी), योषा रॉय (आसामचे सात्रीया), प्रिया भट्टाचार्य (तामिळनाडूचे भरतनाट्यम) नृत्यप्रकार सादर केले. ‘रंगबती’ गाण्यावरील लोकनृत्याने उपस्थितांना ताल धरायला लावला. सर्व महिला कलाकारांना ‘रज क्वीन’चा क्राऊन देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. ममता मिश्रा म्हणाल्या, “ट्रस्टतर्फे गेल्या १५ वर्षांपासून ‘एक विचार, अनेक राज्ये’ या कल्पनेवर आधारित भारतीय शास्त्रीय नृत्य, संगीत, कला व संस्कृतीचे शिक्षण देण्यासह त्याचा प्रचार करत आहे. ओडिशामध्ये रज महोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा रज महोत्सव मासिक पाळी स्वच्छता आणि जागरूकता यांना संस्कृतीशी जोडतो. रज हा मूळ शब्द ‘रजस्वला’ आहे. हा चार दिवसांचा उत्सव असून, ओडिशात प्राचीन काळापासून साजरा केला जातो. हा धरणीमातेच्या मातृत्वाच्या तयारीचे प्रतीक आहे. या चार दिवसांत मुलींना राणीसमान मान असतो. पारंपरिक पोशाख, झुला, गोडधोड पदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने यंदाचा रज महोत्सवी उत्साहाने साजरा झाला.”

