पुणे- तळेगाव येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यावर आतापर्यंत वाहून गेलेल्या आणि अडकलेल्या ४१ जणांची सुटका करण्यात NDRF ला यश आल्याचे वृत्त असून बचावकार्य अजूनही सुरू आहे. परंतु वरच्या भागात पाऊस सुरू आहे आणि आता अंधार पडल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत.त्यासोबतच लोखंडी पुलाचे गर्डर अडकले असल्याने ते काढणे कठीण झाले आहे. आतापर्यंत लहान क्रेनने केलेले प्रयत्न अपयशी ठरले असून आता घटनास्थळी मोठे क्रेन दाखल झाले आहेत. सोबतच अंधार पडत असल्याने लाईटची व्यवस्थाही करण्यात आली आहे, जेणेकरून बचावकार्यात कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये.

दरम्यान पुण्यातील या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटद्वारे सांगितले, “Deeply saddened by the tragic incident of the bridge collapse on the Indrayani River in Talegaon, Pune. Spoke with Maharashtra Chief Minister Shri Devendra Fadnavis and inquired about the present situation on the ground. NDRF teams posted nearby quickly rushed to the site, joined the rescue operation, and saved several lives with remarkable promptness. Heartfelt condolences to the families who have lost their loved ones. Praying for the speedy recovery of the injured.”
या ट्विटमधून त्यांनी सांगितले की, पुण्यातील तळेगाव येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेने त्यांना खूप दुःख झाले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून सध्याच्या परिस्थितीची माहिती घेतली. जवळच तैनात असलेल्या NDRF पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, बचावकार्यात सहभागी झाले आणि उल्लेखनीय तत्परतेने अनेकांचे जीव वाचवले. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांना त्यांनी मनापासून संवेदना व्यक्त केल्या असून, जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक
दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी;
मदत कार्याला तातडीने वेग

पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. शोक संदेशात मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

