आदित्य ठाकरे म्हणाले,’ वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचविणे प्राथमिकता
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे कि ,’मावळ तालुक्यातील कुंडमळा ह्या पर्यटनस्थळी पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी आहे. ह्या दुर्घटनेत इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचविण्यात बचाव पथकाला यश मिळू दे, सर्वजण सुखरूप असू देत; हिच ईश्वर चरणी प्रार्थना!
पुणे- कुंडमळा येथील घटनेतील पर्यटकांच्या मृत्युला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. ग्रामस्थांनी वारंवार नवीन पूलाची मागणी केली होती. मात्र, लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. तर अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतून सावरत नाही, तोच ही घटना मन्न सुन्न करणारी असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले. ही घटना का घडली? याची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे.
कुंडमळा परिसरातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. एवढी मोठी मनुष्यहानी घडतेच कशी काय? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
या सगळ्या घटना बघितल्या, तर शासन आणि प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा या सगळ्याच्या मुळाशी असल्याचे लक्षात येते. पावसाळा सुरू होण्याच्या आधी, ही सगळी महत्त्वाची कामे करायला घेतली पाहिजेत. पावसाळा संपण्याआधी हमरस्त्यांवरील पूल, महत्त्वाच्या नद्या आणि तिथे असणारे रस्ते, या सगळ्या गोष्टींची पाहणी करणे गरजेचे आहे. काही पूल मोडकळीस आले असतील, जीर्ण झाले असतील, तर त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट तपासणे गरजेचे आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
पर्यटकांच्या मृत्युसाठी प्रशासन जबाबदार
कुंडमळ्याजवळ जी घटना घडली, तेथील पूल अत्यंत जीर्ण झालेला होता. ग्रामस्थांनी वारंवार नवीन पूलाची मागणी केली होती. मात्र, लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली, असा आरोप अंधारे यांनी केला. लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी फारसे काही घेणे-देणे नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.विशेष म्हणजे, पूल सुरू होताना आणि संपताना दोन्ही बाजूंनी किमान सूचना फलक लावणे गरजेचे होते. मात्र, या पुलावर साधा सूचना फलक सुद्धा नव्हता. त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेत, ते नैसर्गिक नाही, तर इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहे, असाही गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
पर्यटनाला जाताना काळजी काळजी घ्यावी – सुप्रिया सुळे
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे.
घटनेची सखोल चौकशी करा – रोहित पवार
मावळमध्ये (पुणे) कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून सहाहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे तर २० ते २५ जण वाहून गेल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. गुजरातमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात २७० जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेतून आपण सावरत नाही तोच मन सुन्न करणारी ही दुसरी दुर्घटना घडली. वाहून गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित असावेत आणि सुखरुप परतावेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना! मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ही दुर्घटना का घडली याचीही सखोल चौकशी करण्याची आणि आता पावसाळा असल्याने अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, याचीही काळजी प्रशासनाने घ्यायला हवी.

