मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले २ मृत्यूची प्राथमिक माहिती
मुंबई, दि. 15 :- मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून बचाव आणि मदतकार्य सुरू केले. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलही (NDRF) दुर्घटनेनंतर अल्पावधीतच घटनास्थळी पोचले असून त्यांनीही बचाव व मदतकार्यास सुरुवात केली आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, “कुंडमळा येथे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देशित देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासन या संकटाच्या काळात बाधित नागरिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत शासनामार्फत तातडीने दिली जाईल. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे कि,’पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत
पुणे डीसीपी म्हणाले – अपघात दुपारी ४ वाजता झाला, एनडीआरएफ पथके तैनात
पिंपरी चिंचवड, पुणे झोन २ डीसीपी विशाल गायकवाड म्हणाले, “हा एक जुना जीर्ण लोखंडी पूल होता जो दुपारी ४ वाजताच्या सुमारास कोसळला. प्राथमिक माहितीनुसार, २ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५-७ जणांना वाचवण्यात आले आहे. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.”

