शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे मत ; ‘वेध अस्वस्थ मनाचा’ याअंतर्गत ‘पुणे विद्येचे माहेरघर’ यावर परिसंवादाचे आयोजन
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये शिक्षण संस्था वाढल्या आणि विद्यार्थी संख्याही वाढत गेली. बदलत्या संस्कृतीमुळे विद्यार्थ्यांमधील चंगळवाद वाढीस लागला असून शिक्षणवाद बाजूला राहत आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज असून शिक्षण संस्था आणि पालकांवर पुण्याची ही शिक्षण संस्कृती सुधारण्याची मोठी जबाबदारी आहे, असा सूर ‘वेध अस्वस्थ मनाचा’ यामध्ये ‘पुणे विद्येचे माहेरघर’ या परिसंवादात शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी मांडलेल्या विचारांतून उमटला.
वेध अस्वस्थ मनाचा याअंतर्गत ‘पुणे विद्येचे माहेरघर’ याविषयावर परिसंवादाचे आयोजन पराग ठाकूर, शिरीष मोहिते, उदय जगताप आणि समस्त पुणेकरांच्यावतीने टिळक रस्त्यावरील डॉ. नीतू मांडके सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, शिक्षण प्रसारक मंडळी च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस.के.जैन, चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. फुलचंद चाटे, मिलिंद लडगे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.आर.एम. चिटणीस, आदी सहभागी झाले होते. यावेळी अनिरुद्ध येवले देखील उपस्थित होते. कार्यक्रमात दिलीप विश्वकर्मा, अजय आबा पाटील, मिलिंद लडगे, डॉ. धर्मराज साठे यांचा पुण्याच्या शिक्षण संस्कृतीत व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ.पराग काळकर म्हणाले, पुण्यामध्ये देशभरातून विद्यार्थी येत आहेत. त्यामुळे हॉस्टेल सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात विचारणा होते. शिक्षणापेक्षा पाल्याला इतर सुविधा जास्त मिळतात का याकडे पालकांचे लक्ष आहे. मात्र, वाढत्या सुविधा आणि खर्च करण्यास सहजपणे मिळणारे पैसे यामुळे विद्यार्थी स्वातंत्र्यांकडे न जाता स्वैराचाराकडे जाऊ शकतात, हे नियंत्रित होणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे, तेच शिक्षण घेऊन त्याची करियर म्हणून निवड करावी. सध्या महाविद्यालयीन खर्चापेक्षा खाजगी क्लासेस व इतर गोष्टींवर खर्च मोठ्या प्रमाणात होत आहे. तो योग्य आहे का? याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे.
प्रा. फुलचंद चाटे म्हणाले, विद्यार्थ्यांना योग्य वेळेत चांगले संस्कार मिळणे गरजेचे आहे. पालक आणि शिक्षण संस्थांची यामध्ये मोठी जबाबदारी असून शिक्षणाचे आणि त्यावर पालकांच्या होणाऱ्या खर्चाची जाणीव मुलांना करून देणे गरजेचे आहे.
अॅड. एस.के.जैन म्हणाले, आजचे विद्यार्थी चंगळवादाकडे जात आहेत ही जरी एक बाजू असली तरी त्यांना शिक्षणासोबत दुसऱ्या गोष्टी देणे गरजेचे आहे. जेणेकरून चंगळवादाला आवर घालता येईल. तसेच हे विद्यार्थी चांगल्या कामांमध्ये गुंतून राहतील. विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. चांगले वळण लावण्यास शालेय वयापासूनच शाळेत आणि घरामध्ये पालकांकडून सुरुवात व्हायला हवी.
डॉ.आर.एम. चिटणीस म्हणाले, पुण्यातील बदलत्या शिक्षण संस्कृतीमध्ये काही चांगले आणि काही वाईट बदल झाले आहेत. वाढत्या संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी थांबवण्याकरिता सायकल डे, मेट्रोचा वापर असे पर्याय राबविणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या वाढत्या नाईट लाईफला सर्व शिक्षणसंस्थांनी एकत्र येऊन विरोध करायला हवा. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या सुविधा बंद झाल्या, तर आपोआप ही परिस्थिती बदलू शकेल. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती बंधनकारक केल्यास ही परिस्थिती बदलू शकेल. अनेक ठिकाणी ही विद्यार्थी उपस्थिती केवळ कागदावरच दाखवली जाते, त्यामुळे देखील विद्यार्थी इतर गोष्टींकडे आकर्षित होत आहेत.
मिलिंद लडगे म्हणाले, आई-वडिलांकडून मिळणारा पैसा इकडे खर्च करणे आणि त्यावर चैन करणे हा चंगळवाद वाढत चालला आहे. अभ्यासापेक्षा इतर गोष्टींकडे मुलांचे लक्ष जास्त जात आहे. त्या करता ठोस पावले उचलून ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. पराग ठाकूर व प्रसाद भारदे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रांत मोहिते यांनी प्रास्ताविक केले. पियुष शहा यांनी आभार मानले.

