पुणे :
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘गंगोत्री होम्स’ संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेला ‘पर्यावरण दिन पुरस्कार २०२५’ सोहळा रविवारी, दि. १५ जून रोजी म. ए. सो. सभागृह (बाल शिक्षण मंदिर), मयूर कॉलनी, कोथरूड येथे उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीमती मेधा ताडपत्रीकर (रुद्र संस्था,पुणे ) व अनिकेत लोहिया (मानवलोक संस्था, अंबेजोगाई) यांना सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी रुपये ५० हजार असा ‘गंगोत्री होम्स पृथ्वी पुरस्कार’ व ‘गंगोत्री होम्स जल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर होते. त्यांनी ‘पर्यावरण व विकास यांचा समतोल’ या विषयावर सखोल विचार मांडले. त्यांनी गंगोत्री होम्सच्या पर्यावरणपूरक कार्यपद्धतीचे कौतुक करत मेधा ताडपत्रीकर व अनिकेत लोहिया यांच्या कार्याची स्तुती केली.
श्रीमती ताडपत्रीकर यांनी प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधन निर्मितीचा अभिनव प्रयोग सादर केला आहे. त्यांच्या कार्यातून पर्यावरण साक्षरता आणि पुनर्वापराचा आदर्श उभा राहिला आहे. अनिकेत लोहिया यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांत जलसंवर्धन आणि पाणलोट क्षेत्र विकासाचे प्रभावी कार्य केले आहे.या सोहळ्यात ‘गंगोत्री होम्स’चे संचालक राजेंद्र आवटे, गणेश जाधव यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचा आढावा घेतला. तसेच हा पर्यावरण पुरस्कार देण्यामागची भूमिका विषद केली. पर्यावरणपूरक बांधकाम, नद्यांची स्वच्छता, वृक्षारोपण, जनजागृती, सायकल वाटप, पुनर्वापर प्रकल्प आदी उपक्रमांच्या माध्यमातून गंगोत्री होम्सने शाश्वत विकासाचा आदर्श घालून दिल्याचे ते म्हणाले.सुभाष देशपांडे, प्रा. विजय परांजपे, आनंद अवधानी, डॉ.पूर्वा केसकर, संतोष गोंधळेकर आदी उपस्थित होते. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.‘गंगोत्री होम्स’चे संचालकमकरंद केळकर यांनी आभार मानले.
पर्यावरणपूरक जीवनशैली टिकवून ठेवावी : प्रकाश जावडेकर
माजी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले,’पर्यावरण आणि विकास हे एकत्रच आहेत त्यात द्वैत नाही . भारतातील स्वच्छ भारत अभियानामुळे पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली. पुढे रेल्वेसह अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक व्यवस्था अमलात आणण्यात आम्हाला यश आले.कचरा व्यवस्थापन हा जनतेला सोबत घेऊन सहभाग वाढवून करण्याचा विषय आहे .
पाणलोट क्षेत्र विकास कार्यात गंगोत्री आणी मी एकत्र काम नव्वद च्या दशकात केले आहे.तोच धागा पकडून मी या पुरस्कार सोहळयाला आलो आहे.पर्यावरण क्षेत्रातील चांगल्या योगदानाचा गौरव करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे.आताच्या परिस्थितीत आपण जलवायू परिवर्तन समजून घेतले पाहिजे.कार्बन उत्सर्जन ही मूळ समस्या आहे.भारत हा जगाच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन करीत नाही. कार्बन इफिशियन्सी चे उद्दीष्ट आपण गाठले आहे. पण हवामान बदलाचे दुष्परिणाम भारत सोसत आहे.सौर ऊर्जा निर्मिती मध्ये आपण आघाडीवर आहोत.ही उर्जा साठवून ठेवण्याचे आव्हान देखील भारत पेलून दाखवेल. आपली जीवनशैली पर्यावरणपूरक आहे,ती बदलू नये. देवराईसारख्या परंपरा आपल्याकडे आहेत.कारण जगात अशी जीवनशैली सापडणार नाही.पुणे ही पाण्याची राजधानी असली तरी १५ वर्षात परिस्थिती बदलू शकते. आताच ३ हजार टँकर पुण्यातील सोसायट्यांना लागतात.आपल्याला नियोजन करावे लागणार आहे.
प्लास्टिक ही समस्या नाही. वापरलेल्या प्लास्टिकचे संकलन, वर्गीकरण होत नाही, ही समस्या आहे, इमारतीसाठी पर्यावरणाचे नियम आणखी कडक करण्याची आवश्यकता आहे.ग्रीन बिल्डीग चे प्रमाण पाच – सात टक्के आहे,ते वाढले पाहिजे. त्या बाबतचे निकष पाळले गेले पाहिजे.असेही जावडेकर यांनी सांगितले.अनिकेत लोहिया म्हणाले पाण्याचे समन्यायी वाटप संकल्पनेवर आम्ही काम करीत आहोत. मराठवाड्यातील पाणी समस्ये मुळे स्थलांतर होण्याची समस्या निर्माण झाली आहे. वृद्ध, स्त्रिया, बालकांवर परिणाम होत आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.प्लास्टिक वापर, पुनर्वापर, प्रक्रिया क्षेत्रात कल्पकतेच्या वापरापेक्षा लोकांची मानसिकता बदलणे महत्वाचे आहे, असे मनोगत मेधा ताडपत्रीकर यांनी व्यक्त केले.

