डेहराडून
रविवारी पहाटे ५:२० वाजता केदारनाथजवळील गौरीकुंड येथे एक हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये पायलटसह सर्व ७ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका २ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. या दुर्घटनेत वणी, यवतमाळ येथील जैस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
हे हेलिकॉप्टर केदारनाथ मंदिरातून गौरीकुंडला भाविकांना घेऊन गेले होते. प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात झाला. हे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे आहे.
उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरण (UCADA) नुसार, हेलिकॉप्टरमध्ये उत्तर प्रदेश-महाराष्ट्रातील प्रत्येकी २ आणि उत्तराखंड, राजस्थान, गुजरातमधील प्रत्येकी १ प्रवासी होता. गौरीकुंड येथून NDRF आणि SDRF बचाव पथके रवाना करण्यात आली आहेत.
चारधाम यात्रा हेलिकॉप्टर सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले- हेली सेवेच्या संचालनासाठी कठोर एसओपी तयार केली जाईल. यामध्ये, उड्डाणापूर्वी हेलिकॉप्टरची तांत्रिक स्थिती तपासणे आणि हवामानाची अचूक माहिती घेणे बंधनकारक केले जाईल.

