मुंबई-मुंबईच्या गोवंडी परिसरात रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला असून, डंपरने तीन तरुणांना चिरडले. या दुर्घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी काही वेळातच मोठा जमाव जमला. संतप्त जमावाने वाहनाची तोडफोड केल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. लोकांनी डंपर चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात घाटकोपर-मानखुर्द लिंकरोडवर घडली. एका भरधाव डंपरने तिघांना चिरडले. अपघातानंतर जमावाने या मार्गावर काही काळ ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला. यावेळी डंपरच्या काचा फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे या मार्गावर दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
जमावाच्या ठिय्या आंदोलनामुळे विक्रोळी व घाटकोपरकडून येणारी वाहने तसेच नवी मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णपणे थांबली होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलिस दाखल आहेत. संतप्त जमावाला समजावून ठिय्या आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळाले. या भागात मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले आहे.
अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बॅरिकेड्स लावून तपास सुरू करण्यात आला आहे. अपघाताच्या वेळी डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे. चालकाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमध्ये भीषण अपघात घडला. पालघरच्या मेंढवण घाटात रसायन वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला असून मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वाहनासोबत हा अपघात घडला. अपघातामुळे कंटेनरमधील रसायन हवेत पसरल्याने मोठ्या प्रमाणावर महामार्गावर धूर पसरला होता. त्यामुळे, स्थानिक नागरिकांमध्ये, वाहन चालकांमध्ये भीतीच वातावरण पसरले. दरम्यान, सध्यामहामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
दरम्यान, मुंबईत वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यांवरील वाहतुकीचे नियमन, अवजड वाहनांवरील नियंत्रण आणि चालकांची वैद्यकीय तपासणी या बाबींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

