पुणे- “सोमवारपर्यंत हिंजवडी मेट्रोचे अडथळे दूर न केल्यास पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (PMRDA) 10 कोटी रुपयांची दंडाची नोटीस पाठवली जाईल,” असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला आहे.
मुसळधार पाऊस, सकल भागात साठणारे पाणी अशातच मेट्रोचे रखडलेली काम अन् या सर्वांमुळे होणारी वाहतुक कोंडी.. या सर्व समस्यांमुळे पुणेकरांचे हाल होत आहेत. अनेक तक्रारी करुनही महापालिकेकडून गंभीर दखल घेतली जात नाही. अशातच, पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांच्या या समस्येची गंभीर दखल घेतली असून मेट्रो अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. वाहतूक विभागाच्या बैठकीत पवारांनी शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडींचे खापर पवारांनी मेट्रोवर फोडले आहे.
झालेल्या या बैठकीमध्ये पवार यांनी हिंजवडी येथील टाटा मेट्रोच्या अडथळ्यांचा विशेष उल्लेख केला. यावेळी त्यांनी या परिसरातील परिसरातील राडारोडा हटवला नाही, तर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. “सोमवारपर्यंत हिंजवडी मेट्रोचे अडथळे दूर न केल्यास पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (PMRDA) 10 कोटी रुपयांची दंडाची नोटीस पाठवली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी पुणे मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहेत. मात्र, याच कामामुळं पुणेकरांनी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात राडारोडा पडला आहे. अशातच पाऊस सुरु झाल्यामुळे या समस्येत आणखी भर पडली आहे. मेट्रोचा राडारोडा चिखलात मिसळल्यामुळं रस्ते अधिकच खराब झाले आहेत. त्यामुळं वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
अशातच आषाढी वारीसाठी पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दाखल होणार आहेत. त्यामुळे पालखी मार्गावरील भाविकांना आणि दररोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना तासंतास रस्त्यावर अडकून पडावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पवारांनी कडक सूचना दिल्या आहेत.
पुण्यात पालखी आली की वारकरी मिळेल त्या रस्त्याने बाहेर पडत असतात. त्यामुळे पालखी मार्गावरील भाविकांना त्रास होऊ नये यासाठी तातडीने राडारोडा हटवा असे आदेश त्यांनी दिले आहे. तसेच, दिवे घाटात सध्या रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे यंदा दिवे घाट चढताना वारकऱ्यांना अडचण येणार आहे. त्यामुळे फ्लेक्स जाहिरात फलक पालखी मार्गावरुन काढायला सांगितले आहे. अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

