वारकरी संप्रदाय तत्वज्ञानावर आधारित वर्धिष्णु संप्रदाय
ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी : भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे भारती कीर्तन महोत्सव
पुणे : वारकरी संप्रदाय हा केवळ भक्तीप्रधान नसून, तो तत्त्वज्ञानावर आधारित एक ‘वर्धिष्णु’ संप्रदाय आहे. या संप्रदायाचा विस्तार होत असताना केवळ संख्यात्मक वाढ झाली आहे, परंतु गुणवत्तात्मक वृद्धीची कमतरता जाणवते. भारती विद्यापीठाच्या कीर्तनाच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून याचा सखोल अभ्यास होणार आहे. आजकाल अनेक ठिकाणी जे कीर्तन सादर केले जाते, त्याला खरेच कीर्तन म्हणावे का, असा प्रश्न निर्माण होतो. कारण कीर्तन हे उदरनिर्वाहाचे साधन नसून तो भक्तीचा मार्ग आहे. याच विचाराने विद्यार्थ्यांनी कीर्तनाचे शिक्षण घ्यावे, असे मत ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे भारती कीर्तन महोत्सवाचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७०४ वा प्रकट दिन, संत तुकाराम महाराज यांचा ३५४ वा बीज सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी योगीराज महाराज बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी, प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. डाॅ. सदानंद महाराज मोरे यांच्यासह ह.भ.प. डाॅ. भावार्थ महाराज देखणे, ह.भ.प. उल्हास महाराज सूर्यवंशी, ह.भ.प. सचिन महाराज पवार, ह.भ.प. भागवत महाराज साळुंखे, भारती विद्यापीठ सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, डाॅ. म.शि. सगरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक शारंगधर साठे उपस्थित होते. महोत्सवात ह.भ.प.गणेश महाराज भगत आणि ह.भ.प.प्रमोद महाराज जगताप यांचे वारकरी कीर्तन झाले.
ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी म्हणाले, मागील सात-आठ वर्षांपासून भारती विद्यापीठाने वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले आहे. कीर्तनाकडे धर्म, भक्तीचे, प्रबोधनाचे माध्यम म्हणून पाहिले गेले आहे. संत साहित्य हे कालातीत आहे. ते सर्व काळासाठी मार्गदर्शक ठरते. ती केवळ कला नाही तर वारकऱ्यांच्या भक्तीचे मोठे माध्यम आहे. नवविधा भक्तीत कीर्तनाला दुसरे स्थान प्राप्त असून त्याद्वारे श्रद्धा, समर्पण आणि आत्मिक उन्नतीचा मार्ग सुचवला जातो.
डाॅ. सदानंद मोरे म्हणाले, महाराष्ट्रात अनादी काळापासून कीर्तन परंपरा आहे. कीर्तन परंपरेमुळे संतपरंपरा देखील टिकून राहिली आहे. मराठी प्रमाण भाषा कीर्तनात टिकवली जाते. शब्दांचे अर्थ सांगितले जातात. कीर्तन हे वैचारिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करणारे असते. या कीर्तन परंपरेला आधुनिक चौकट देऊन विद्यापीठीय चौकटीत कीर्तनाचे शिक्षण द्यायची सुरूवात भारती विद्यापीठाने केली आहे. त्यामुळे विद्यापीठाचे कौतुक करावे लागेल.
मिलिंद जोशी म्हणाले, कीर्तनाने समाजाचे वैचारिक भरण पोषण केले आहे. कीर्तनकारांनी समाजाला ज्ञान देण्याचे कार्य केले. लाखो लोक कीर्तनातून प्रेरणा घेतात. कीर्तन ही एक कला आहे, पण त्याचे करिअर देखील होऊ शकते. कीर्तन शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवले पाहिजे यासाठी भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ने कीर्तन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले आहेत.
शारंगधर साठे म्हणाले, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ही नवी शैक्षणिक धोरणानुसार ‘कीर्तन’ विषयातील पदवी अभ्यासक्रम सुरू करणारी पहिली संस्था ठरली आहे. आता कीर्तन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी कीर्तनाचे प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुद्धा सुरू केले आहेत.
ह. भ. प. उल्हास महाराज सूर्यवंशी, ह. भ. प. सचिन महाराज पवार, ह. भ. प. भागवत महाराज साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.

