मुंबई-शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याची माहिती आहे. तसेच येत्या 10 जानेवारीपर्यंत याप्रकरणी निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर देणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष 10 जानेवारीपर्यंत वाट न पाहाता, आज किंवा उद्यापर्यंतच निकाल जाहीर करू शकतात अशी शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरतील का? आणि जर ते अपात्र झाले, तर राज्य सरकारचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे जर पात्र ठरले तर उद्धव ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतील का? किंवा यापेक्षा वेगळा निकाल लागेल का? अशा अनेक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांना याबाबत निर्णय घ्यायचा आहे. ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली त्यावेळी राजकीय पक्ष कोणाचा होता? जर त्यादिवशी राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंचा होता, तर मग राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष अशी जी विभागणी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात केली आहे, त्याचा नेमका अर्थ काय? याचा सारासार विचार करुन अन्वयार्थ लावणारा हा देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक निवाडा असणार आहे. विधानसभा अध्यक्षांनीही स्वतः अनेकदा हा निवाडा ऐतिहासिक असल्याचे विधान केले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रविवारी वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. दोघांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. न्याय देणारा ट्रिब्युनल हाच आरोपीच्या घरी त्याला भेटायला जातो. यावरूनच देशातील न्याय व्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोहोचली आहे हे लक्षात येते असे राऊतांनी म्हंटले आहे.

