परभन्ना फाउंडेशन आणि कृषी पर्यटन विश्व आयोजित परिसंवाद
पुणे: “अवकाळी पाऊस, शासनाची बदलती धोरणे, पर्यावरणीय बदल यामुळे शेतीचे स्वरूप अनिश्चित होत आहे. अनेकदा शेतकऱ्यांच्या हाती निराशाच येते. त्यातून सर्वत्र हताशाचे वातावरण पहायला मिळते. मात्र, शेतीला जोडव्यवसाय म्हणून कृषी पर्यटन व्यवसाय उभा केला, तर शेतकरी समृद्ध होईल. महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी शेतीला कृषी पर्यटनाची जोड देऊन यशस्वी वाटचाल केल्याचे पाहून आनंद वाटतो,” असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांनी केले.
परभन्ना फाउंडेशन, कृषी पर्यटन विश्व आणि धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठान आयोजित जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त ‘महाराष्ट्र कृषी पर्यटन परिसंवाद २०२५’ कार्यक्रमात मिलिंद शिंदे बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी ‘शासकीय धोरणे आणि कृषी पर्यटनाचा विकास’ या विषयावर मान्यवरांनी विचार मांडले. शिंदे यांच्यासह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, जिल्हा पर्यटन अधिकारी अजिंक्य लुगडे, मुलुख फार्म्स कृषी पर्यटन केंद्राचे कृषिराज पिलाणे यांनी विचार मांडले. प्रसंगी परभन्ना फाउंडेशनचे संस्थापक गणेश चप्पलवार, मनीषा उगले, धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठानचे पंकज चव्हाण, वल्लरी प्रकाशनाचे व्यंकटेश कल्याणकर, सारंग मोकाटे, असीम त्रिभुवन, सूर्यकांत पोतुलवार, अजित मांदळे, महेश गोरे, महेश चप्पलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
वल्लरी प्रकाशन प्रकाशित व गणेश चप्पलवार लिखित ‘कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा’ पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच सुरेश जनाबाई गोविंदराव मराठे (तिकोणा फार्म कृषी पर्यटन केंद्र), मंगल रमेश भिंगारे (रमणीय कृषी पर्यटन केंद्र), अजय मिठारे (वेदभूमी इको व्हिलेज ऍग्रो टुरिझम), कृषिभूषण बन्सी तांबे (कृषिभूषण कृषी पर्यटन केंद्र), डॉ. अमोल पुंडे (वेदकस्तुरी कृषी पर्यटन केंद्र), अनिल मगर (चित्री ऍडव्हेंचर इको अँड ऍग्री टुरिझम), मानसिंगराव वसंतराव जगदाळे (शिवांजली कृषी पर्यटन केंद्र), युवराज सांडभोर (अमलताश कृषी पर्यटन केंद्र), सरस्वती कनिफनाथ हेंद्रे (आनंदी जीवन कृषी पर्यटन केंद्र), धनश्री हेमंत गायकवाड (अंजली कृषी पर्यटन केंद्र) यांना ‘कृषी पर्यटन उद्योजकता पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. मीनाक्षी पाटील म्हणाल्या, “उपलब्ध साधनसामुग्रीच्या वापर करून शेतीला पुरक व्यवसाय कसा करता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे. आपणच आपला आवाज बनून या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास साधून तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. शासनाच्या योजनांचा फायदा घेऊन कृषी पर्यटन उद्योजक वाढवण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली पाहिजेत.” कृषी पर्यटनाची ओळख महाराष्ट्राने भारताला करून दिली. कृषी पर्यटन ही केवळ संकल्पना नसून देशाला दिशा देण्याच काम सुरू असल्याचे गणेश चप्पलवार यांनी नमूद केले.
अजिंक्य लुगडे, कृषिराज पिलाणे यांनीही विचार मांडले. व्यंकटेश कल्याणकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. पंकज चव्हाण यांनी आभार मानले.

