मुंबई-कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखातून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून भाजपवर टीका केली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाल्याचे पाहायला दिसत आहे. तसेच आजच्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने हायजॅक केल्याचा दावा केला आहे. लाडकी बहीण योजनेच्या आडून भाजपने त्यांचे चांगभलं केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी यांनी जे म्हटले आहे ते आम्ही पूर्वीपासूनच सांगत होतो. राज्यातील विधानसभा निवडणूक ही भाजपने चोरली, लुटली आणि दरोडा घातला. राहुल गांधी हे सातत्याने तेच सांगत आहेत आणि आम्ही सुद्धा तेच बोलत आहोत. राज्यात भाजपा आणि त्यांच्या टोळ्यांचा विजय होऊच शकत नव्हता. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक आम्ही जिंकल्यावर असे त्यानंतरच्या सहा महिन्यात काय घडले की ज्याच्यामुळे तुम्हाला इतका मोठा एकतर्फी विजय प्राप्त व्हावा, असा सवाल त्यांनी महायुतीला विचारला. ते तर 25 जागा सुद्धा जिंकू शकत नव्हते, असा दावाही संजय राऊतांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, लाडकी बहीण या आवरणाखाली ही निवडणूक भाजपने हायजॅक केली. राहुल गांधी यांनी जे पाच मुद्दे उपस्थित केले ते वारंवार केले आहेत आणि आंतरराष्ट्रीय मंचावर सुद्धा उपस्थित केल आहेत. भारतातील लोकशाही ही मोदी-शाह-फडणवीस यांनी हायजॅक केली. निवडणूक आयोगापासून अनेक संवैधानिक संस्थांना त्रास दिला आहे. खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते मोदी यांना द्यायला हवा, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, त्यांचे बाळासाहेबांवरील प्रेम बेगडी आहे. 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेत बंड झाले, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार घेऊन बंड केला. शिंदेंनी थेट सेनेवरच ताबा सांगितला. त्यावेळी ते खूप घाबरले होते. एकनाथ शिंदे माझा अत्यंत जवळचा मित्र. तो मला सांगत होता माझ्याबरोबर चल. मी म्हटले तू पण जाऊ नको, तुम्ही का जात आहात? अयोध्येला आम्ही एकत्र गेलो होतो. माझ्या खोलीत येऊन मला ते सांगत होते की आपण जाऊ. शेवटी एकनाथ शिंदे हे घाबरुनच गेले.
पुढे संजय राऊत म्हणाले, मला ते म्हणाले माझं तुरुंगात जायचे वय नाही. आता मला नातवंडे झाली. मी म्हटले मलाही नातवंडे झाली आहेत. पण म्हणून पक्षाने आपल्याला जे इतकी वर्षे दिलेय त्यांच्या छातीवर पाय ठेवून बाहेर पडणे हे मी बाळासाहेब ठाकरेंशी प्रतारणा केल्यासारखे होईल. मी तुम्हालाही सांगतो की तुम्ही जरा धीर धरा, शांत राहा. मी जेव्हा हे सांगतो तेव्हा माझ्यामुळे काय पक्ष फुटला का? हे सगळे डरपोक आहेत म्हणून गेले.