पुणे: बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) वतीने शहरी विकासाची दिशा ठरवणाऱ्या ‘बांधकाम क्षेत्राचा विकास व स्वयं-पुनर्विकास’ यावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. येत्या शुक्रवारी (ता. १३) शनिवार पेठेतील विष्णुकृपा सभागृहात दुपारी ३ ते ७ या वेळेत हे चर्चासत्र होणार आहे.
या चर्चासत्रामध्ये माजी सनदी अधिकारी व ‘महरेरा’चे संस्थापक गौतम चॅटर्जी, ‘महरेरा’चे सचिव प्रकाश साबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. चॅटर्जी हे स्वयं-पुनर्विकास प्रक्रियेवर आणि महाराष्ट्रातील गृह पुनर्विकास भागीदार मंडळाच्या भूमिकेवर आपले विचार मांडतील. चर्चासत्रामध्ये महाराष्ट्रात ‘महाआयटी’पासून ‘महाक्रिटी २०२५’ पर्यंत झालेल्या ‘महरेरा’च्या प्रगतीतील बदल, शहरविकासात स्वयं-पुनर्विकासाची भूमिका यावर तज्ज्ञ विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमात बांधकाम व्यावसायिक, विकासक, स्थापत्य अभियंते, एमईपी सल्लागार, सरकारी कंत्राटदार, गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी, कर सल्लागार यांच्यासह अनेक क्षेत्रांतील सहभागी सहभागी होणार आहेत.
‘महरेरा’च्या वरिष्ठ टीमकडून ‘क्यूपीआर’ अनुपालन, प्रकल्प विस्तार, दुरुस्ती, कालबाह्यता आणि स्थगित प्रकरणांवरील महत्त्वपूर्ण अद्ययावत माहिती उपस्थितांना दिली जाणार आहे. हा कार्यक्रम सर्व भागधारकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. मात्र, सुयोग्य नियोजनासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, त्याची अंतिम तारीख ११ जून २०२५ अशी आहे, अशी माहिती संयोजक बीएआय महाराष्ट्र गृहनिर्माण समितीच्या अध्यक्षा ज्योती चौगुले आणि ‘बीएआय’ पुणे केंद्राचे अध्यक्ष अजय गुजर यांनी दिली आहे.

