भाजपचा तो पदाधिकारी महिला अधिकाऱ्याबद्दल अशा पद्धतीचा दोषी तर त्याला गजाआड का नाही केले? प्रवेश बंदी ही कुठली शिक्षा ??
पुणे : थेट PMO मधून महापालिका आयुक्त पदावर आलेल्या नवल किशोर राम यांनी मोठा धाडसी निर्णय घेतला आहे ,ज्याच्यावर एका महिला अधिकाऱ्याने काही आरोप केले आहेत अशा एका भाजपा पदाधिकाऱ्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला महापालिका आयुक्तांनी महापालिका भवनासह अन्य कार्यालयांत थेट प्रवेशबंदी केली आहे.महापालिका हे एक लोकशाहीचे पारदर्शक कामकाज पाहणारे सार्वजनिक स्थळ आहे आणि महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला अशी प्रवेशबंदी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळातच नव्हे तर संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे.’भाजपच्या कामगार आघाडीचा शहराध्यक्ष असलेल्या ओंकार कदम व त्याचा सहकारी अक्षय कांबळे यांना पुढील आदेशापर्यंत महापालिका मुख्यालय व अन्य कार्यालयांमध्ये तत्काळ प्रवेशबंदी करण्यात येत आहे,’ असे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी शुक्रवारी काढले. दरम्यान महापालिकेत आय ए एस अधिकाऱ्याला चप्पल मारणे , अन्य अधिकाऱ्यांना धमकावणे ,बसलेल्या अधिकाऱ्याच्या खुर्चीवर लाथ मारणे, एका भाजपच्याच माजी नगरसेविकेला देखील शिवीगाळ दमबाजी करणे असे अनेक प्रकार यापूर्वी घडलेत आणि त्याबद्दल पोलिसात तक्रारी दाखल आहेत अशा तक्रारी ज्यांच्याबद्दल दाखल आहेत त्यांच्यावर आता नवे आयुक्त कारवाई करणार काय ? हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे . आणि या सर्व बाबी नंतर महापालीकेत रामराज्य प्रस्थापित होणार कि प्रशसकीय राज्य राहणार हे ठरणार आहे . निवडणुकीनंतरच लोकराज्य येईल हे हि निश्चित आहे.
बदलीच्या भीतीने आरोप
‘आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी तक्रारी आल्यानंतर आम्ही माहिती अधिकारात माहिती मागितली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगूनही संबंधित महिला अधिकाऱ्याने ही माहिती दिली नाही. यामुळे बदली होईल, या भीतीने महिला अधिकाऱ्याने आपल्यावर आरोप करून महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून भ्रष्टाचार सुरू आहे. याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत. या प्रकरणात मी दोषी आढळलो तर पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे,’ असे ओंकार कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कदम याच्याविरोधात एका महिला अधिकाऱ्याकडून कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा २०१३ नुसार आयुक्तांसह महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. पूर्वपरवानगी न घेता जमावासह महिला अधिकाऱ्याच्या कक्षात प्रवेश करून व्हिडिओ चित्रीकरण करणे, दमदाटी करणे, अर्वाच्य भाषा वापरणे, कक्षात गोंधळ करणे आदी कारणांमुळे ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर अंतर्गत तक्रार समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. समितीच्या शिफारशीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
‘काही तक्रारदार वारंवार पत्र, निवेदने, तक्रार सादर करून अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबाव आणून धमक्या, अरेरावी, शिवीगाळ करून गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन करीत आहेत. नागरिकांप्रति उत्तरदायी असलेल्या महापालिका अधिकारी, कर्मचारी वर्गाचे आरोग्य, सुरक्षितता व मनोबल अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला कठोर पाऊल उचलणे अपरिहार्य आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तींनी पालिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांना प्रतिबंध करून त्वरित स्थानिक पोलिसांकडे फिर्याद नोंदवावी,’ असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
एकतर्फी निर्णय नको दोन्ही बाजूनी चौकशी करून कारवाई करा –महापालिका कार्यालयात कामाच्या ठिकाणी महिला अधिकार्याचा लैंगिक छळ कसा होऊ शकतो ? असा प्रश्न आता महिला आयोगाला विचारला जाऊ ला गला आहे.तर, विशिष्ट हॉस्पिटलची बिले वेगाने तपासण्या होतात आणि वेगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतात या साखळीची तसेच सुमारे ३० कोटीच्या अदा केलेल्या बिला संदर्भात मंगळवार पेठेतील एका १० बेडच्या रुग्णालयात झालेल्या बोगस ह्र्दय शस्त्रक्रीये संदर्भात महापालिका आयुक्तांनी चौकशी केली आहे कि नाही हे समजू शकलेले नाही .कदम जर दोषी आहेत तर पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करवून त्यांना गजाआड जरूर करा .त्यांच्यावर कडक कडक कारवाई करा पण महापालिकेत RTI कार्यकर्ते येतात पण सगळेच काही डँबिस नसतात , जे डँबीस आहेत त्यांच्यामुळे चांगल्या कार्यकर्त्यांचाही अशा घटनांमुळे गळा घोटला जाऊ नये अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे एकतर्फी निर्णय नको दोन्ही बाजूनी चौकशी करून कारवाई करा आणि पोलिसात तक्रार दाखल करा , कोणालाही महापालिकेत प्रवेश बंदीचा आदेश काढणे घटनाबाह्य वाटेल असे काही करू नका अशी मागणी होऊ लागली आहे.महापालिकेत सर्वत्र CC TV असताना अधिकाऱ्यांना व्हिडीओ चित्रीकरणाची भीती वाटू नये , पोलीस आयुक्तांनी जर सर्वच पोलीस ठाण्यात नागरिकांना व्हिडीओ चित्रीकरणासाठी अडथळा ठेवलेला नाही तर महापालिकेतही तो असता कामा नये अशी भावनाही व्यक्त होताना दिसत आहे.

