पुणे- पुण्यासाठी ऑनलाइन टीडीआर पोर्टल सुरु करू,७० फूट उंचीवरील इमारतींना परवानगी देण्यासाठी कार्यवाही सुरु करू अशा पद्धतीच्या घोषणा आज येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या. क्रेडाई – पुणे मेट्रो २०२५ च्या नवनिर्वाचित समितीची सर्वसाधारण सभा आणि पदस्थापना समारंभ आज संपन्न झाला. या नवनियुक्त समितीकडून अधिक चांगले, पारदर्शक व पथदर्शी काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नवनियुक्त समितीस शुभेच्छा दिल्या.यावेळी क्रेडाई पुणे संस्थेचे अध्यक्ष मनीष जैन, उपाध्यक्ष नितीन ख्याती, अरविंद जैन, सतीश मगर, शांतीलाल कटारिया, बांधकाम क्षेत्रातील सर्व व्यावसायिक आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम, महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे आणि नगरविकास खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बांधकाम क्षेत्रातील सर्व मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.यावेळी शिंदे म्हणाले,’ ‘नो रीझन, ऑन द स्पॉट डिसीजन’ ही माझी कामाची पद्धत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाच्या माझ्या कार्यकाळात मुंबई-पुणे मिसिंग लिंक असेल, पुणे रिंग रोड असेल, मुंबई आणि पुण्यातील मेट्रो मार्ग असतील, कोस्टल रोड, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग असेल, अशा सर्वच विकास प्रकल्पांमधले अडथळे दूर करून या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला. आमचे सरकार हे स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे. कालच आम्ही समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा सुरू केल्याचे सांगितले.
बांधकाम क्षेत्र हे कृषीनंतर सगळ्यात जास्त रोजगार देणारे क्षेत्र असून राज्याच्या जीडीपी मध्ये या क्षेत्राचा वाटा मोठा आहे. पिंपरी चिंचवडची प्रारूप योजनाही लवकरच आपण मंजूर करू, पीएमआरडीए डेव्हलपमेंट प्लॅनचा विषय कोर्टात प्रलंबित असून तोही लवकरात लवकर सोडवू, पीसीएमसी मध्येही युनिफाईड डीसीपीआर प्रमाणे नियमावली तयार करण्याचा निर्णय घेऊ, मुंबईप्रमाणे पुण्यासाठीही ऑनलाइन टीडीआर पोर्टल सुरु करू, हरित इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे स्थापन केली जाणारी त्रिसदस्यीय समिती देखील लवकरच स्थापन करू, ७० फूट उंचीवरील इमारतींना परवानगी देणाऱ्या समितीबाबत मुंबईच्या धर्तीवर निर्णय घेऊ असे याप्रसंगी सांगितले.
नगरविकास विभागाने एसआरए क्लस्टरची नियमावली तयार केली असून त्यातही सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी केले. तसेच समृद्धी महामार्गावर विकसित असलेल्या नोड्स मध्येही आपण सहभागी व्हावे अशी विनंती केली. वाढत्या पुण्याचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, वाहतूक कोंडी, शहर नियोजन, पूर नियंत्रण रेषेतील बांधकामांचा प्रश्न सोडवायला नक्की प्राधान्य देऊ आणि मुंबईच्या धर्तीवर पुण्यातील पायाभूत सुविधांचा विकासाला प्राधान्य देऊ असे याप्रसंगी शिंदे यांनी नमूद केले.

