शिवजयंती महोत्सव समितीचा अभिनव उपक्रम : सलग १३ व्या वर्षी शिवराज्याभिषेक तथा सार्वजनिक शिवस्वराज्य दिन सोहळा साजरा
पुणे : शिवस्वराज्य दिन चिरायू होवो.. शिवराज्याभिषेक दिन चिरायू होवो… जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा गगनभेदी जयघोषात, रणशिंगाच्या ललकारीत, मर्दानी खेळाच्या चित्तथरारात आणि ढोल ताशाच्या गजरात एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकाचा आणि विश्वातील पहिल्या शिवराज्याभिषेक शिल्पाचा परिसर हजारो शिवभक्तांनी दणाणून सोडला. यावेळी शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे रयतेच्या “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” सोहळ्या निमित्त भगव्या स्वराज्यध्वजा सह ५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.
सोहळ्याचे हे सलग १३ वे वर्षे होते. यावेळी रिंकल अमित गायकवाड, ललिता रवींद्र कंक, अश्विनी शंकर कडू, वृषाली सुनील जगताप, शोभा भोई, दिपाली विशाल गव्हाणे, जोस्ना निलेश जगताप, अश्विनी दरेकर तसेच उपस्थित महिलांच्या व शिवांश सुभाष जागडे यांच्या हस्ते भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे विधीवत पूजन करुन ५१ फूट स्वराज्यगुढी उभारण्यात आली. शिवकालीन सरदारांचे वंशज, सार्वजनिक शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, समितीचे सचिव सचिन पायगुडे, उपाध्यक्ष रवींद्र कंक, सदस्य शंकर कडू, नाना निवंगुणे, प्रवीण गायकवाड, सुनील जगताप, विवेक तुपे, अजित शिंदे, मोहन पासलकर सर्व स्वराज्यघराणी, स्वराज्यबांधव, महिलावर्ग उपस्थित होते.
सोहळ्याची सुरुवात शिवरायांच्या विश्वातील पहिल्या शिवराज्याभिषेक शिल्पाचे पूजन करुन झाली. त्यानंतर शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी स्पर्धा परीक्षेत देशात २६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या शिवांश सुभाष जागडे यांचा शिवरायांच्या जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला.
अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. शिवजयंती प्रमाणे शिवराज्याभिषेक दिन ६ जून हा सार्वजनिक शिवस्वराज्य दिन वैश्विक साजरा व्हावा ह्या प्रेरणेतून ६ जून २०१३ ला शिवरायांच्या जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंच स्वराज्य चिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सर्वप्रथम दुर्गदुर्गेश्वर रायगड, लालमहाल, राजगड यासह असंख्य ठिकाणी उभारुन “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
अमित गायकवाड यांनी सात्यत्याने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत २०२१ सालापासुन ग्रामविकास खात्याने तसेच उच्च व तंत्र खात्याने शासकीय परिपत्रक काढून महाराष्ट्रातील ३३ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या आणि सुमारे ४३,००० गावांत त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील सर्व अकृषीक, अभिमत, स्वयंअर्थसाहाय्यिक विद्यापीठ, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतने आणि तत्सम शिक्षण संस्थामंध्ये हा दिवस “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” स्वराज्यगुढी उभारुन साजरा करण्यास सुरुवात केली. सोहळ्याच्या १३ व्या वर्षात आता प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, शहरात, महाविद्यालयात, राज्यात तसेच देशविदेशात “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” स्वराज्य गुढी उभारुन साजरा केला जात आहे. ३५२ व्या शिवराज्याभिषेक वर्षात हा दिवस भारत सरकारने “राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन” म्हणून जाहीर करुन शिवरायांना देशस्तरीय मानवंदना द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पुण्यामध्ये दरवर्षी एसएसपीएमएस लालमहाल, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन,चंद्रमौलेश्वर मंदिर यासह अनेक ठिकाणी स्वराज्य गुढी उभारली जाते. त्याचबरोबरीने यावर्षी शिवकालीन सरदारांच्या वंशजांकडून शिवनेरी, राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड, संग्रामदुर्ग यासह ३५१ गडांवर तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ, लक्ष्मीबाई दत्त मंदिर यासह ३६० गणेशोत्सव मंडळानी देखील स्वराज्यगुढी उभारुन सार्वजनिक शिवस्वराज्य दिन साजरा केला.
कार्यक्रमाचे आयोजन सोहळयाचे प्रवर्तक अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, प्रवीण गायकवाड, गोपी पवार, मोहन पासलकर, महेंद्र भोईटे यांसह असंख्य स्वराज बांधवांनी केले आहे.

