मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या संभाव्य आघाडीवर मोठे विधान केले. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल. या प्रकरणी आमच्या व त्यांच्या (राज ठाकरे) मनात कोणताही संभ्रम नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गट व मनसे लवकरच एकत्र येतील, असा दावा केला जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकारी सुजाता शिंगाडे यांनी शुक्रवारी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर उपरोक्त भाष्य केले. ते म्हणाले, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. मी हे एका वाक्यात सांगितले आहे. याविषयी बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहत आहोत. मी या प्रकरणी कोणताही संदेश देणार नाही. थेट बातमी देईल. माझ्या व शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. त्यांचेही मनसैनिक एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याही मनात कोणता संभ्रम नाही. माझ्या मते, संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्हाला जी काही बातमी द्यायची आहे, ती देऊ.
शिंदे गटात गेलेल्यांना पश्चाताप-उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुजाता शिंगाडे यांचा दाखला देत शिंदे गटात गेलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना मोठा पश्चाताप होत असल्याचाही दावा केला. सुजाता शिंगाडे यांनी आपल्या भावना नेमक्या शब्दांत मांडल्या आहेत. त्या शिवसेना सोडत असल्याची बातमी कळली, तेव्हा आम्हाला धक्का बसला होता. वाईटही वाटले होते. आपली एवढी जुनी कार्यकर्ती का व कशासाठी शिवसेना सोडू शकते? असा प्रश्न आम्हाला पडला होता. ठीक आहे, आता हा विषय संपला आहे.सुजाता शिंगाडे यांनी शिंदे गटात जी काही बेबंदशाही सुरू आहे याचा जवळून अनुभव घेतला आहे. त्यांना तेथील विचित्र वातावराचा अनुभव आला. त्यांना तिथे कुणाशीही जुळवून घेता आले नाही. त्या बैचैन व अस्वस्थ होत्या. तिकडे गेल्यानंतर अनेकांना पश्चाताप होतोय. पण तुमच्या सारखा निर्णय घेण्याचे धाडस फार कमी लोकांमध्ये असते. ही हिंमत व धाडस केवळ शिवसैनिकांमध्येच असू शकते. लाचारीसाठी तिकडे गेलेल्या लोकांमध्ये असे धाडस असू शकत नाही. आज संपूर्ण शिवसेना कुटुंब आनंदी आहे. त्यांचा आमच्या पक्षातील प्रवेश हा शिंदे गटात गेलेल्या कार्यकर्त्यांसाठी एक संदेश आहे, असे ते म्हणाले.

शिंदे गटात कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही – शिंगाडे सुजाता शिंगाडे यांनीही यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी 30 जानेवारी रोजी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता जवळपास 5 महिने झाले. ती माझी फार मोठी चूक होती. ओरिजनल शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची व मातोश्रीचीच आहे हे सर्वांनीच लक्षात ठेवावे. मागील 4-5 महिन्यांत मला फार वाईट अनुभव आले. मला त्यांनी कोणतेही आमिष दिले नाही. त्यामुळे मी त्यांची मिंधी नाही. वयाच्या 10 व्या वर्षापासून मी शिवसेनेचे काम करते. मला विभागात गटप्रमुखापासून ते विभाग संघटकापर्यंतची सर्वच पदे मला मातोश्रीमु्ळे मिळाली.जवळपास 35 वर्षे मी संघटनेचे काम केले. इतर लोक कोणत्या आमिषाला बळी पडून शिंदे गटात जात आहेत हे मला माहिती नाही. मला 4 महिन्यांतच तिथे राहणे शक्यच नसल्याचा अनुभव आला. मला 4 महिने झोप लागली नाही. शिंदे गटात सर्वकाही देखावा आहे. ते नगरसेवकांना 2-3 कोटी देऊन पक्षात घेत आहेत. या सर्वांना तिथे पश्चाताप होत आहे. तिथे कुणाचाच कुणाशी ताळमेळ नाही, असे शिंगाडे म्हणाल्या.

