पुणे: शास्त्रीय गायन व वादनाचा मिलाफ असलेल्या ‘गंगाधर स्वरोत्सव युव-रंग’ मैफलीचे येत्या शनिवार (ता. ७) व रविवार (ता. ८) या दोन दिवशी आयोजन केले आहे. स्वरनिनाद संस्थेच्या वतीने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) सभागृहात पुणेकर रसिकांसाठी ही संगीत-गायन पर्वणी विनामूल्य आयोजिली आहे. भारतीय शास्त्रीय संगीत व गायन क्षेत्रातील उभरत्या युवा कलाकारांना आपली प्रतिभा रसिकांसमोर सादर करण्याची संधी देणारे हे व्यासपीठ आहे.
कार्यक्रमात शरयू दाते, एस. आकाश, अथर्व वैरागकर, अनुभव खामरु, अमन वरखेडकर, इशा नानल, स्वरा, सारा, स्पृहा, इशिता, इशल, युवान हे युवा कलाकार सादरीकरण करणार आहेत. तर आशय कुलकर्णी, अभिनय खंदे, कार्तिकस्वामी माधव लिमये, यशद गायकी, आशिष बेहरे व निषाद जोशी यांची साथसंगत लाभणार आहे, अशी माहिती स्वरनिनाद संस्थेच्या वृषाली निसळ यांनी दिली. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. अमोल निसळ यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम होत आहे.
स्वरनिनाद संस्थेच्या माध्यमातून दहाहून अधिक वर्षे शास्त्रीय संगीताची सेवा केली जात आहे. गंगाधर स्वरोत्सव, युवरंग यासह इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन संस्थेतर्फे केले जात आहे. विविध मान्यवर कलाकारांनी गेल्या दहा वर्षात गंगाधर स्वरोत्सव या तीनदिवसीय सांगीतिक कार्यक्रमात आपली कला सादर केली आहे. संगीतसेवेचा हा यज्ञ यापुढेही असाच चालू राहणार आहे, असे वृषाली निसळ म्हणाल्या.

