प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडून सर्व कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आग्रहाचे निमंत्रण
पुणे | ६ जून २०२५ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यंदा आपला २६ वा वर्धापन दिन पुण्यातील बालेवाडी येथे मोठ्या उत्साहात आणि भव्य कार्यक्रमाच्या स्वरूपात साजरा करणार आहे. याबाबत माहिती देताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार बांधवांबरोबरच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना कार्यक्रमासाठी आग्रहाचे निमंत्रण दिले.

या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार, पक्षाचे वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, माजी आमदार-खासदार, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर होणारा हा पहिला वर्धापन दिन असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे, असे तटकरे यांनी सांगितले.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवप्रतिमेला अभिवादन व समाजोपयोगी उपक्रम
३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून, तटकरे यांनी पुण्यातील बालेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पूनम विशाल विधाते यांच्या पुढाकाराने मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या पत्रकार परिषदेस आणि उपक्रमांसाठी प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, आ. चेतन तुपे, प्रमुख प्रवक्ते आनंद परांजपे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, सुरेश घुले, योगेश बहेल, राजलक्ष्मी भोसले, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार विलास लांडे, सुभाष जगताप, प्रदीप देशमुख, प्रमोद हिंदुराव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने घड्याळ चिन्हावर ७ जागा जिंकत भक्कम कामगिरी केली. यामुळे राज्यभरात पक्षाबाबत जनतेचा विश्वास वाढला असून कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे. “राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात सध्या प्रचंड उत्साह आहे,” असे मत यावेळी मा. तटकरे यांनी व्यक्त केले.
महायुती सरकारचा घटक म्हणून सकारात्मक वाटचाल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या महायुती सरकारचा महत्त्वाचा भाग आहे. या सरकारमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यरत आहेत. प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा असून, राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले धोरण पारदर्शकतेने लोकांसमोर मांडले आहे.
कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आणि आत्मविश्वास वाढवणारा कार्यक्रम
या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचे सिंहावलोकन करण्यात येणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दिशादर्शनदेखील होणार आहे. पक्षाचे भविष्यातील ध्येय धोरण जनतेपुढे मांडले जाणार आहे.
महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या अपेक्षा लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजाभिमुख, पारदर्शक व विकासात्मक कारभार करण्यास कटिबद्ध आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्षाचे एकजूट आणि जनतेप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित केली जाणार आहे, असेही मा. तटकरे यांनी सांगितले.

