बेंगळुरू,: टीव्हीएस मोटर कंपनीने आज घोषणा केली की कंपनीच्या संचालक मंडळाने एकमताने श्री. सुदर्शन वेणू यांची कंपनीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक म्हणून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कंपनीच्या सातत्यपूर्ण वाढीला आणि धोरणात्मक विकासाला दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. २५ ऑगस्ट २०२५ पासून सुदर्शन वेणू यांची अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून अधिकृतपणे नियुक्ती होणार आहे.
कंपनीचे सध्याचे अध्यक्ष सर राल्फ स्पेथ यांनी संचालक मंडळास सूचित केले आहे की, ते आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा संचालकपदासाठी अर्ज करणार नाहीत. त्यामुळे, २२ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या समाप्तीनंतर ते अध्यक्षपदाचा राजीनामा देतील.
संचालक मंडळाने २३ ऑगस्ट २०२५ पासून पुढील तीन वर्षांसाठी सर राल्फ स्पेथ यांची कंपनीचे मुख्य मार्गदर्शक (Chief Mentor) म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा व कौशल्याचा कंपनीला पुढेही लाभ मिळणार आहे.
टीव्हीएस मोटर कंपनीचे चेअरमन एमेरिटस श्री. वेणू श्रीनिवासन म्हणाले:
“मागील तीन वर्षांत अध्यक्ष म्हणून सर राल्फ यांनी दिलेल्या विलक्षण नेतृत्वाबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. जागतिक बाजारपेठांमध्ये आमचा विस्तार साधण्यास आणि नावीन्यपूर्णतेला चालना देण्यात त्यांचे योगदान अनमोल ठरले आहे. मुख्य मार्गदर्शक या नव्या भूमिकेत ते आम्हाला पुढेही मार्गदर्शन करतील. तसेच सुदर्शन यांचे अध्यक्षपदी स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. व्यवस्थापकीय संचालक या भूमिकेत त्यांनी कंपनीसाठी उत्कृष्ट प्रगती साधली असून, त्यांच्या नेतृत्वात टीव्हीएस मोटर अजून उच्च शिखरांकडे झेप घेईल, असा मला विश्वास आहे.”
सर राल्फ स्पेथ म्हणाले:
“गेल्या तीन वर्षांत टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष म्हणून काम करणे हे माझ्यासाठी सन्माननीय होते. या काळात मला भरभरून सहकार्य आणि मैत्री लाभली. मी आता अध्यक्षपदाची जबाबदारी सुदर्शनकडे सोपवत असून, त्यांच्या नेतृत्वात टीव्हीएस कंपनीचा विकास अधिक वेगाने होईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. सुदर्शन यांचा उत्साह, दृष्टीकोन आणि मूल्यांवरील निष्ठा कंपनीच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी आहे.”
सुदर्शन वेणू म्हणाले:
“मला ही अनोखी संधी दिल्याबद्दल संचालक मंडळाचे मन:पूर्वक आभार! मी अत्यंत नम्रतेने आणि उत्साहाने ही जबाबदारी स्वीकारत आहे. आमचे चेअरमन एमेरिटस यांनी ज्या मूल्यांवर टीव्हीएसची घडी बसवली – ग्राहक केंद्रीता, गुणवत्ता आणि तंत्रज्ञान – आपण भविषाकडे पाहताना याच मूल्यांवर आधारित काम करत राहणे, नव्या संधींचा लाभ घेणे आणि भविष्याची नव्याने कल्पना करणे आवश्यक आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. सर राल्फ यांनी आम्हाला जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय प्रतिभेला सामावून घेण्यासाठी, नव्या प्रक्रिया स्वीकारण्यासाठी आणि भविष्यातील उत्पादने व तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित केले आणि मार्गदर्शन केले. मुख्य मार्गदर्शक या भूमिकेत त्यांचं मार्गदर्शन पुढेही लाभेल, ही बाब आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. टीव्हीएसचा खरा आधार म्हणजे संपूर्ण टीमचा उत्साह आणि जोश! आपल्या सामायिक भविष्यासाठी या भागीदारीच्या पुढील प्रवासाची मी आतुरतेने वाट पाहतो आहे.”

