पुणे-मोटार पार्किंगच्या वादातून तरूणाला बेदम मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील २५ हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेणार्या टोळीला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना धनकवडीतील काशिनाथ पाटील नगरात घडली होती. बबलु विवेक कोठारी (वय ३०, रा. बालाजीनगर, धनकवडी ) लोकेश विवेक कोठारी (वय २१) आणि शाम चांदेकर (वय २१ रा. धनकवडी ) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी थेरगावमध्ये राहणार्या तरुणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण थेरगावमधील असून, ३ जूनला रात्री पावणेअकराच्या सुमारास धनकवडीतील बालाजीनगरात आले होते. त्याठिकाणी मोटार पार्क करीत असताना टोळक्याने त्यांच्यासोबत हुज्जत घातली. त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील २५ हजारांची सोन्याची चैन चोरून नेली होती. घटनेची माहिती मिळताच, सहकारनगर पोलिसांनी तातडीने तपासाला गती दिली. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील पुढील तपास करीत आहेत.

