खासदार मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने शनिवारवाड्याची पाहणी, वृक्षारोपण
पुणे: “मध्यकालीन भारताच्या इतिहासात योगदान असलेल्या शनिवारवाड्याचे स्थान महत्वाचे आहे. ही वास्तू पुण्याची, पेशवाईची ओळख आहे. दरवर्षी लाखो पर्यटक शनिवारवाड्याला भेट देतात. इथे येणाऱ्या पर्यटकांना शनिवारवाड्याचा भव्यदिव्य अनुभव देण्यासाठी पुरातत्व विभागाच्या नियमांच्या अधीन राहून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी गुरुवारी केले.
पुण्याचे वैभव, ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या शनिवारवाड्याला गजेंद्रसिंह शेखावत यांनी भेट देऊन पाहणी केली. राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने या भेटीचे आयोजन केले होते. प्रसंगी शेखावत यांच्या हस्ते बहुभाषिक स्मार्ट डिजिटल ऑडिओ गाईड ऍपचे उद्घाटन, तसेच, शनिवारवाड्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पुरातत्व विभागाच्या संचालक श्रीलक्ष्मी, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा, शनिवारवाडा संवर्धनासाठी कार्यरत किरण कलमदानी, उदय कुलकर्णी, पल्लवी गोखले, इतिहास अभ्यासक डॉ. गणेश राऊत आदी उपस्थित होते.
गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यानंतर पेशवाई आणि पुण्याचे योगदान व त्याचा नावलौकिक देशभरात आहे. त्यामुळे ही केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून, समृद्ध इतिहासाचा अनमोल ठेवा आहे. पर्यटकांना येथील इतिहास सहजपणे समजून घेता यावा, पर्यटन अधिक सुकर व्हावे, यासाठी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यासह इतर इतिहास अभ्यासकांनी व शनिवारवाडा संवर्धन कार्यात योगदान देणाऱ्या लोकांनी माझ्याकडे काही प्रस्ताव दिले आहेत. शनिवारवाड्याचे विविध पैलू, त्याचे महत्व समजून घेतले. त्यावर विचार करून, पुरातत्व विभागाशी समन्वय साधून येथे सोयीसुविधा उभारण्यासाठी प्रयत्न करेन. आज उद्घाटन झालेल्या ऑडिओ गाईडमुळे पर्यटकांना शनिवारवाड्याचा इतिहास ध्वनिस्वरूपात समजून घेता येईल.”
“ही संरक्षित वास्तू असल्याने इथे सुधारणा करण्यावर बरीच बंधने आहेत. मूळ साच्यामध्ये फेरबदल करता येत नाही. यासह अन्य काही अडचणी असल्याने ऐतिहासिक संरक्षित वास्तूंमध्ये पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधा तयार करण्यात अडचणी येतात. तरीही यातून मार्ग काढून या पर्यटनस्थळाचा अनुभव चांगल्या पद्धतीने कसा घेता येईल, यावर उपाययोजना करणार आहोत. संरक्षित वास्तूच्या १०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करता येत नाही, तर २०० मीटर परिसरात काही काम करायचे असल्यास कायद्याने परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शक्य होईल, त्या सुविधा उपलब्ध करून देऊ,” असेही त्यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “भारताच्या इतिहासात पुण्याला आणि शनिवारवाड्याला अनन्यसाधारण महत्व आहे. पेशवा बाजीराव यांच्यासह पेशवाईतील इतर अनेकांचा जाज्वल्य इतिहास येथे येणाऱ्या पर्यटकांना माहिती व्हावा, शनिवारवाड्याचे वैभव काय होते, हे प्रतिकृतीच्या माध्यमातून का होईना, पर्यटकांना दाखवण्यासाठी उभारण्याची गरज आहे. त्यासाठी मंत्री महोदय, तसेच पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करत आहे. गणपती महाल, मूळ सात मजली शनिवारवाडा व अन्य प्रसंग, छायाचित्रांचे दालन अशा गोष्टी येथे उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”

