एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला–समृद्धी महामार्ग होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी गेम चेंजर प्रकल्प ठरणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. समृद्धी महामार्गावर अकरा लाख मोठी आणि बावीस लाख छोटी झाडे लावण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक हा महामार्ग असणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. कृषी, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा समृद्धी महामार्ग गेम चेंजर ठरणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
नाशिक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते ठाण्यातील आमणे पर्यंतच्या 76 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन आज झाले आहे. यामुळे एका अर्थाने मागील वेळी मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण झाले आहे. यामुळे नागपूर ते मुंबई मधील अंतर कमी झाले असून वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकास गाथेतील एक मुकुटमणी, ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चा अंतिम टप्पा (इगतपुरी ते आमणे -76 किमी) सज्ज झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गावरील इगतपुरी–आमणे (76 किमी) अंतिम टप्प्याचे भव्य लोकार्पण होत आहे. या लोकर्पणानंतर संपूर्ण 701 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होऊन नागपूर–मुंबई प्रवास फक्त 8 तासांत पूर्ण करता येणार आहे.
फडणवीसांच्या गाडीचे स्टेअरिंग एकनाथ शिंदेंच्या हातात–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर या मार्गावरील बोगद्यातून या तिन्ही नेत्यांनी प्रवास केला. विशेष म्हणजे या वेळी देवेंद्र फडणवीस यांची गाडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालवली. या आधी मागील वेळी झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांची गाडी देवेंद्र फडणवीस यांनी चालवली होती, हे विशेष.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच गाडीत प्रवास केला असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र वेगळ्या गाडीतून या मार्गावरून जाताना दिसले. त्यामुळे याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. सरकार म्हणून आम्ही एकत्र काम करत आहोत. एकत्र निर्णय घेतले जात आहेत. हेलिकॉप्टरमध्ये देखील या तिघांनी एकत्र प्रवास केला. राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या नेत्याने आपल्या गाडीत बसावे, अशी इच्छा असते. त्यानुसार अजित पवार हे वेगळ्या गाडीत बसले होते. त्यात चर्चा करण्यासाठी काहीही नसल्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे.

आम्ही तिघेही एकत्रित गाडी चालवत आहोत. आम्ही तिघेही उत्तम ड्रायव्हर आहोत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे अतिशय उत्तम ड्रायव्हर आहेत. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची आणि ड्रायव्हिंगची सवय असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आमची गाडी अत्यंत छान चालू आहे. आम्ही तिघेही तीन शिफ्ट मध्ये गाडी चालवत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आता गाडी मी चालवणार आहे. त्यामुळे आम्ही बरोबर गाडी चालवतो का? हे तुम्ही दादांना विचारा, अशी मिश्किल टिपण्णी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ड्रायव्हिंग केले. यावर पत्रकारांनी अजित पवार यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी एका शब्दात ‘गार गार वाटतय’ असे उत्तर दिले. अजित पवार यांच्या या मिश्किल टिपण्णी मुळे सर्वांमध्ये हशा पिकला होता. मात्र महायुतीमधील नेते एकत्रित समृद्धी महामार्ग वरील प्रवासाचा आनंद लुटताना दिसले.
देशातील सर्वात अत्याधुनिक महामार्ग
समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणे हा शेवटचा ७६ किमी लांबीचा मार्ग आहे. या मार्गावर वाहने धावू लागल्यावर इगतपुरी ते कसारा घाट अवघ्या ८ मिनिटात पार करता येणार आहे. याआधी मुंबईहून नाशिकला जाताना पुर्वी ४ तासापेक्षा अधिक वेळ लागत होता. तो समृद्धी महामार्गामुळे आता २ तास ३० मिनिटे इतका वेळ कमी झाला आहे. समृद्धी ६ पदरी, १२० मीटर रुंदीचा आणि ७०१ किलोमीटर लांबीचा असुन देशातील सर्वात अत्याधुनिक महामार्ग आहे, असे म्हटले जाते.
६५ उड्डाणपूल, ६ बोगदे
समृद्धी महामार्ग १५० किमी प्रतितास गतीने प्रवासासाठी डिझाइन करण्यात आला आहे. या महामार्गावर ६५ उड्डाणपूल, २४ इंटरचेंज, कसारा घाटात ६ बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास आहेत. इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटा जवळ ८ किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे, जो अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टिमने सुसज्ज आहे.

