सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी धनंजय मुंडे यांच्याविरोधातील कथित कृषी घोटाळ्याचे पुरावे एसीबी अर्थात अँटी करप्शन ब्यूरोला दिले. तसेच या पुराव्यांमुळे आता धनंजय मुंडे वाचणार नाहीत असा ठाम दावाही केला. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेल्याचा दावा केला जात आहे.
अंजली दमानिया यांनी काही महिन्यांपूर्वी तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर एसीबीने त्यांना या आरोपांचे पुरावे देण्याचा समन्स बजावला होता. त्यानुसार, दमानिया यांनी बुधवारी अँटी करप्शन ब्यूरोच्या येथील कार्यालयाला भेट देऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुरावे दाखल केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आता धनंजय मुंडे वाचणार नाहीत असा दावा केला.
अंजली दमानिया म्हणाल्या, मी आज कृषी घोटाळ्याशी संबंधित दस्तऐवज एसीबीला दिले. आत्ताच्या घटकेला मी एवढेच सांगेन की, अँटी करप्शन ब्यूरोने या प्रकरणी योग्य ती कारवाई केली, तर याच्यातून धनंजय मुंडे वाचत नाहीत. पण त्यांच्यावर शासकीय किंवा प्रशासनाची मेहेरबानी झाली तर मला माहिती नाही. पण आज जी काही माहिती मी दिली, ती अत्यंत खरी असून, त्यात कोणतीही शंका नाही. मी दिलेले दस्तऐवज 3 कंपन्यांशी संबंधित आहेत. त्यापैकी 2 कंपन्यांमध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट होते. त्यांनी पदावर असताना एवढा मोठा कृषी घोटाळा केला. त्यात पहिल्या टप्प्यात 341 कोटींपैकी 161 कोटी खाल्ले गेलेत. हा घोटाळा नाही तर काय आहे? असे त्या म्हणाल्या.
धनंजय मुंडे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. ते तिथे काही धार्मिक विधी करत आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधण्यासही नकार दिला. पत्रकारांनी याविषयी अंजली दमानिया यांना छेडले असता त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी तोंडावर बोट ठेवले असेल तर मी काय बोलणार? मी ज्या दिवशी कृषी घोटाळा उघड केला, त्यानंतर लगेचच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी सर्वच आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही तर त्यांनी मला वाट्टेल ती टोपण नावेही दिली होती. आज ती वेळ आली आहे.
आज पेपरद्वारे मी शासनाकडे खरी माहिती पोहोचवली आहे. आता त्यांना प्रत्येक गोष्टीत पुरावे देण्यासाठी यावे लागणार आहे. माझे पेपर्स एसीबीने घेतलेत. आता माझे स्टेटमेंट झाल्यानंतर त्यांना या दोन्ही गोष्टी लावून सरकारकडे परवानगी मागायची असते की, यांच्यावर कारवाई करायची की नाही? तिथे त्यांना परवानगी मिळाली, तर पुढची चौकशी होईल. अन्यथा त्यांना (धनंजय मुंडे) वरून दिलासा मिळाला तर काय होईल हे मला माहिती नाही, असे त्या म्हणाल्या.
अंजली दमानिया यांनी यावेळी वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी अडचणीत सापडलेल्या आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनीही आपल्यावरील आरोपांत कोणतेही तथ्य नसल्याचा दावा केला होता. त्यांनी 4 मार्च रोजी माझ्याविरोधात मानहाणीची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पण आजतागायत त्यांच्याकडून मला कोणतीही नोटीस आली नाही. आता जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनीही मला मानहाणीची नोटीस पाठवण्याचा इशारा दिला. पण आजपर्यंत त्यांचीही नोटीस मिळाली नाही. आज सुरेश धस यांनी त्यांच्यावर जे आरोप केलेत, ते एक्झॅटली मला देखील कळवण्यात आले होते.
आता वाल्मीक कराडची तुरुंगात जी सरबरबाई होत आहे, ती सुपेकर यांच्यामुळेच होत आहे. त्यांच्याच मेहेरबानीने बीडच्या कारागृहात जे राहत आहेत, त्याचीही माहिती मला मिळाली होती. ती भाजप आमदार सुरेश धस यांनी आज मांडली. जालिंदर सुपेकर यांनी कैद्याकडून 300 कोटींची मागणी केल्याचा माहिती मला तुमच्याकडूनच मिळत आहे. मी जेव्हा बोलते ते पुराव्यांसकट बोलते. त्यामु्ळे धसांनी आपल्या आरोपांखातर पुरावे दाखवावे.

