पुणे: वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील येरवडा परिसरात तलाठी कार्यालय पुन्हा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात आमदार बापूसाहेब पठारे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे यासंदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली होती. जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून कार्यालय लवकरच कार्यान्वित होत असल्याचे पुणे शहर तहसिलदार यांनी सांगितले आहे.
येरवडा, फुलेनगर, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, विश्रांतवाडी, कल्याणीनगर व परिसरात आज रोजी लाखो नागरिक वास्तव्यास आहेत. महसूल व इतर शासकीय कामांसाठी तलाठी कार्यालयातून मिळणारे दाखले व इतर कागद घेण्यासाठी नागरिकांना खडकमाळ आळी येथील तलाठी कार्यालयात जावे लागत होते.
पठारे म्हणाले की, “येरवडा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मागणी अतिशय योग्य होती. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवणे व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हे माझे कर्तव्य आहे. तलाठी कार्यालय सुरू झाल्यास नागरिकांना त्यांच्या जवळच शासकीय सेवा मिळणार आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे”, असे मत व्यक्त करत त्यांनी जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.
येरवडा परिसरातील नागरिकांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले असून, स्थानिक पातळीवर या कार्यालय सुरू झाल्याने मोठा फायदा होईल, असे सांगितले जात आहे.

