पुणे, दि. ०३ जून २०२५: महावितरणच्या पुणे प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात मंगळवारी (दि. ३) थाटात उद्घाटन झाले. त्यानंतर पुणे परिमंडलाने सादर केलेल्या ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’ या नाट्यकृतीने रसिकांची मने जिंकली.
पुणे प्रादेशिक नाट्यस्पर्धेचे उद्घाटक म्हणून संचालक श्री. सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प) व श्री राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे (पुणे), श्री. स्वप्निल काटकर (कोल्हापूर) व श्री. धर्मराज पेठकर (बारामती) उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी महावितरणकडून नाट्यस्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. या व्यासपीठावर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. महावितरणमधील आपापली जबाबदारी सांभाळून हौशी नाट्यकलावंत दर्जेदार नाट्यकृती सादर करतात. त्यास प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो ही आनंदाची बाब असल्याचे सांगत संचालक श्री. सचिन तालेवार व संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे म्हणाले की, वर्षभर विविध पदांचे कर्तव्य बजावत असताना नाट्य कलावंताना कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळते. या संधीचे सोने करण्यासाठी प्रचंड मेहतन घेतली जाते. व्यावसायिक दर्जाच्या बरोबरीने नाटकांचे सादरीकरण होते, ही समाधानाची व आनंदाची बाब आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांनी केले. मराठी संस्कृतीचा नाटक हा अविभाज्य भाग आहे. नाटकांची ही समृद्ध परंपरा महावितरण देखील जोपासत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंते सर्वश्री ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, अमित कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नाट्यस्पर्धेच्या पहिल्या सत्रात अजित दळवी लिखित ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’ या नाटकाच्या कसदार सादरीकरणातून पुणे परिमंडलाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. वैद्यकीय सेवा हा व्यवसाय आहे की धंदा यातील संघर्ष चितारताना पुण्याच्या नाट्यकलावंतांनी नाट्यसंहितेचे अप्रतिम सादरीकरण केले. यात प्रामुख्याने सोनाली बाविस्कर (वैदेही), भक्ती जोशी (रत्ना), सचिन निकम (डॉ. पेंडसे), विजय जोशी (शिरीष), अभिजित भालेराव (पवार) यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. तर विशाल कानपिळे, अविनाश लोखंडे, स्नेहलता हंचाटे, शैलेंद्र भालेराव यांनीही आपापल्या भूमिकांना न्याय दिला. बुधवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता बारामती परिमंडलद्वारे शफाअत खान लिखित ‘राहिले दूर घर माझे’ ही नाट्यकृती सादर होईल. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरणचा कार्यक्रम होईल.

