संभाजीनगर -भाजपने ज्यांच्याविरोधात मोर्चे काढले, तेच लोक आज भाजपसोबत सत्तेत आहेत. भाजपच्या या स्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मंगळवारी केली. यावेळी त्यांनी सध्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश मिळत असल्याची खंतही व्यक्त केली.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 11 व्या स्मृतीदिनानिमित्त प्रकाश महाजन यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजपच्या विद्यमान धोरणांवर निशाणा साधला. ते म्हणाले, पूर्वी भाजपमध्ये चळवळीत काम करणाऱ्यांना प्रवेश दिला जात होता. गोपीनाथ मुंडे हे स्वतः चळवळीतून आले होते. त्यांचे सर्वच नेत्यांशी चांगले संबंध होते. पण आज भाजपची अवस्था पाहिल्यावर खंत वाटते. आता भ्रष्टाचारातून भाजपमध्ये एन्ट्री मिळते. अशोक चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासारखे लोक आज भाजपसोबत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सिंचन घोटाळ्यासंबंधी एक मोर्चा निघाला होता. त्यात गोपीनाथ मुंडे यांचे डोके फुटले होते. ज्यांच्याविरोधात हा मोर्चा निघाला होता, तेच लोक आज देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला बसल्याचे दिसतात. ही दुर्दैवी गोष्ट आहे. संघर्षाच्या काळात अनेकजण भाजपसबोत होते. पण सत्ता आल्यानंतर ते कुठेच दिसत नाही. भाजप आज प्रोफेश्नल पक्ष झाला आहे. विशेष म्हणजे त्यांचे शिष्य समजल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी पक्षाची ही अवस्था केली आहे, असे ते म्हणाले.
प्रकाश महाजन यांनी यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पाठिंब्याची एक आठवणही सांगितली. गोपीनाथ मुंडे यांचा स्वभाव आव्हानांना सामोरे जाण्याचा होता. त्यांनी कधीही आव्हानांना पाठ दाखवली होती. त्यांच्या मृत्यूच्या आदल्या रात्री एक बैठक झाली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला एका मोठ्या नेत्याने विरोध केला होता. पण गोपीनाथ मुंडेंनी त्यांचे काहीही ऐकले नाही. त्यांनी फडणवीस यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.
माझे वडील काँग्रेस व नेहरूंच्या विचारसरणीचे होते. त्यामुळे गोपीनाथ मुंडे आमच्याकडे आले की, पहिल्यांदा त्यांची भेट घ्यायचे. त्यावेळी आमचे वडील त्यांना म्हणायचे की, गोपीनाथ तू यांच्या (भाजप) नादी लागू नकोस. काँग्रेसमध्ये जा. तिथे तू मुख्यमंत्री होशील. पण दुर्दैवाने ते मुख्यमंत्रीपदापासून फक्त एकच पाऊल मागे राहिले, असेही प्रकाश महाजन यावेळी बोलताना म्हणाले.

