शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी च्या वतीने कै.शाहीर रत्न किसनराव हिंगे स्मृतिदिन
पुणे : ग्रामीण भागात पोवाडा, गवळण, लावणी असे प्रकार जपण्याचे काम होत आहे. मात्र शहरामध्ये ही संस्कृती रुजत नव्हती. ती संस्कृती शहरात रुजविण्याचे काम करण्याची गरज आहे. लोककला हा आपल्या संस्कृतीचा आरसा असून ही कला जोपासायला हवी, असे मत ज्येष्ठ बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे कै.शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या २७ व्या स्मृतीदिनानिमित्त हिंगे यांचे सहकारी ढोलकी वादक विनायक वाघचौरे यांचा सन्मान व शाहिरी निनाद या अंकाचा प्रकाशन सोहळा घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे पार पडला. यावेळी संस्कार भारतीचे अखिल भारतीय लोककला संयोजक निरंजन पंडा, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य मिलिंद कांबळे, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पोवाडा प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात आले.
निरंजन पंडा म्हणाले, भारतीय वाड्.मयात लोक या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. त्यामुळे लोक कलांना खूप महत्व आहे. फोक नाही, तर लोककला ही आपली आहे. समुद्र आणि आकाश याला जसा दुसरा शब्द नाही, त्याप्रमाणे लोककलांना दुसरा शब्द नाही. आपली संस्कृती जीवंत राहण्यामागे लोककलांचे मोठे योगदान आहे. भारतीय कला या सामान्य व्यक्तीला देवत्वाकडे नेणा-या कला आहेत.
विक्रमसिंह मोहिते म्हणाले, काव्यमय चरित्र सांगण्याच्या अनेक पद्धती भारतामध्ये आहेत. मात्र, महाराष्ट्रात पोवाडयाच्या माध्यमातून चरित्र सांगितले जाते. पोवाडयाच्या माध्यमातून लोककला जपण्याचे कार्य अखंडपणे सुरू आहे. तरी देखील अनेक विषय अजूनही शाहिरीमध्ये गुंफणे गरजेचे आहे. पूर्वी या कलेला राजाश्रय होता. स्वातंत्र्यानंतर यात खंड पडला असून प्रबोधिनी सारख्या संस्था हे जपण्याचे कार्य करीत आहेत.
प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंत मावळे म्हणाले, महाराष्ट्र शाहिर परिषद ही संघटना हिंगे यांच्या ४० व्या वाढदिवसाला व शाहिर हिंगे लोककला प्रबोधिनीची स्थापना त्यांच्या ६१ व्या वाढदिवशी झाली. एकाच व्यक्तीच्या वाढदिवशी अशा संस्था स्थापन होणे आणि आजपर्यंत कार्यरत असणे ही एकमेव घटना आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत त्यांचे नाव व कार्य कधीही विस्मृतीत जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
विद्याधर अनास्कर यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ रु. ५१,०००/- निधी शाहिरी भवन गुरुकुलासाठी दिला. यावेळी प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनी पोवाडा सादरीकरण केले. शाहीर गणेश टोकेकर व सहका-यांचा नमन तुज शाहीरा हा पोवाडयाचा कार्यक्रम देखील झाला. अक्षदा इनामदार हिने सूत्रसंचालन केले. प्रा.संगीता मावळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मृणालिनी दुसाने यांनी आभार प्रदर्शन केले.

