पुणे:तुमच्यानंतर तुमच्या मालमत्तेवरून कुटुंबात वाद निर्माण होऊ नयेत, अथवा तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार विल्हेवाट लावयाची असेल, त्यासाठी तुम्ही मुत्युपत्र तयार करू शकता. परंतु ते कसे करावे, ते करताना काय काळजी घ्यावी, या संदर्भातील कायदा काय सांगतो, याची कल्पना अनेकांना नसते.त्यामुळे मुत्युपत्रावरून पुढे वाद निर्माण होतात. हे टाळण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन या संदर्भातील मार्गदर्शन करण्याचा तसेच मृत्युपत्र करून देण्याचा राज्यातील पहिलाच प्रयोग पुण्यात राबविण्यात आला आहे.
ज्येष्ठांप्रती आदर भाव
राज्य शासनाच्या शंभर दिवसीय कार्यालयीन सुधारणा उपक्रमात जिल्हा सहनिबंधक वर्ग पुणे शहर कार्यालयाने विविध उपक्रम राबविले होते. साईराम या उपक्रमात ‘रिस्पेक्ट’ (आदर भाव) याअंतर्गत ज्या ज्येष्ठ नागरिकांना ‘मृत्युपत्र’ या विषयावर मार्गदर्शन करण्याचे ठरविले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मोहम्मदवाडीतील सोनाश्रय वृद्धाश्रमाला जिल्हा सहनिबंधकांनी भेट देऊन तेथे वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मृत्युपत्र विषयावर मार्गदर्शन केले. पुढील टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना या संदर्भात माहिती हवी असल्यास त्यांच्या घरी जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याबाबत जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगाणे म्हणाले, ”जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकास त्याचे मृत्युपत्र नोंदणी करायचे असेल आणि त्यासाठी त्याला दुय्यम निबंधक कार्यालयात तब्येतीच्या कारणास्तव समक्ष येणे शक्य होणार नसेल तर त्यासाठी गृहभेट हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठी संबंधितांनी त्यांच्या जवळच्या दुय्यम निबंधक कार्यालयात वकील किंवा प्रतिनिधीमार्फत अर्जासहित संपर्क साधावा.
असे करा मृत्युपत्र
अर्जाचा नमुना विभागाच्या igrmaharashtra.gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध
मृत्युपत्र करणारी व्यक्ती आजारी असली तरी मृत्युपत्र करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक
अर्ज केल्यानंतर दुय्यम निबंधक दोन-तीन दिवसांमधील त्यांच्या सोयीची वेळ देणार
यासाठी तीनशे रुपये गृहभेट शुल्क आकारे जाते
गृहभेटीसाठी जाताना व गृहभेट प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग करून त्याची सीडी दुय्यम निबंधक द्यावी
अधिक माहितीसाठी नोंदणी विभागाच्या सारथी कॉल सेंटर ८८८८००७७७७ कडे संपर्क साधावा
मृत्युपत्र म्हणजे काय?
मृत्युपत्र म्हणजे स्वतःच्या स्थावर व जंगम मालमतेची आपल्या मृत्युपश्चात केलेली व्यवस्था. स्वतःची मालकी- ज्यामध्ये स्थावर वा जंगम मिळकत जी तुमच्या मालकीची आहे अथवा भविष्यात तुमच्या मालकीची होणार आहे, अशी सर्व मिळकत.
मृत्युपत्र कोणी करावे?
कोणीही सजाण व्यक्ती मृत्युपत्र करू शकते. जिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे, अशी व्यक्ती अथवा मानसिक असंतुलन असलेली व्यक्ती मृत्युपत्र करू शकत नाही. अशा व्यक्तींनी केलेले मृत्युपत्र कायद्याने विचारात घेतले जात नाही.
का करावे?
मृत्युपश्चात आपल्या वारसांमध्ये संपत्तीबाबत होणारे वाद व तंटे टाळण्यासाठी
कसे करावे?
मृत्युपत्र हे लेखी स्वरूपात असणे आवश्यक आहे.
ते कोऱ्या कागदावर लिखित स्वरूपात असणे पुरेसे आहे.
त्याला मुद्रांकशुल्काची आवश्यकता नाही.
त्याच्या दस्ताची नोंदणी कायद्याने बंधनकारक नाही, ती ऐच्छिक आहे.
या पत्राची अंमलबजावणी मृत्युपश्चात होत असल्याने मृत्युपत्राचा दस्त सुस्पष्ट लिखित स्वरूपात करून ठेवणे व त्याची रितसर नोंदणी करणे फायद्याचे ठरते.
मृत्युपत्र नोंदणी करतेवेळी सोबत वैद्यकीय दाखला असणे सोयीचे. त्यातून मृत्युपत्र करणारी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकरित्या सक्षम आहे, हे सिद्ध होते.
मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीने या पत्रावर दोन साक्षीदारांसमक्ष स्वाक्षरी करणे आवश्यक
साक्षीदार हे मृत्युपत्राचे लाभार्थी नसावेत व तेही कायद्याने सजाण असावेत. तसेच ते मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीपेक्षा वयाने मोठे नसावेत.
मृत्युपत्र नोंदणीसाठी खर्च किती येतो
मृत्युपत्राची नोंदणी करण्यासाठी शासनाने नाममात्र नोंदणी शुल्क (१०० रुपये) निश्चित केलेले आहे. त्याची नोंदणी कोणत्याही दस्तनोंदणी कार्यालयात करता येते. मृत्युपत्राच्या दस्ताची प्रमाणित प्रत निष्पादित करणाऱ्यास त्याच्या हयातीमध्ये केव्हाही ते मिळू शकते. लाभार्थ्याला मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्युपश्चात मृत्यू दाखला आणि अन्य आवश्यकत कागदपत्रे सादर केल्यानंतर त्याची प्रमाणित प्रत संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाकडे मिळू शकते. नोंदणीकृत मृत्युपत्र न्यायालयामध्ये आणि अन्य सरकारी कामकाजामध्ये पुरावा म्हणून वापरता येते. त्यामुळे मृत्युपत्राच्या दस्ताची नोंदणी करणे केव्हाही फायदेशीर आहे.
मृत्युपत्र कधी करावे?
कोणीही सक्षम व्यक्ती मृत्युपत्र करू शकते. तसेच पूर्वी केलेले मृत्युपत्र वा लिहून ठेवलेला तत्सम लेख रद्द करू शकते व नव्याने मृत्युपत्र करून ठेवू शकते. मृत्युपत्र कितीवेळा करावे, याला कायद्याचे बंधन नाही. परंतु संबंधित व्यक्तीने आपल्या हयातीत केलेले अखेरचे मृत्युपत्र कायद्याने अंमलबजावणीस पात्र ठरते.

