पुणे- शहरभर असलेले रस्ते , खोदलेले रस्ते येत्या ७ जून पर्यंत चकाचक आणि ठकाठक करा . कोणतेही कारण चालणार नाही, आणि हा पावसाला पूर्ण झाल्यावर हिवाळ्यातच या संदर्भातील ठेकेदारांची बिले काढा असे स्पष्ट निर्देश आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि)ओमप्रकाश दिवटे यांनी येथे दिले.
पावसाळ्यापूर्वी मनपाच्या विविध विभागांना त्यांच्याकडील कामकाजासाठी रस्ते खोदाईची परवानगी देण्यात आली आहे . संबंधित विभागाच्या सर्व मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता , उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे समवेत आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि)ओमप्रकाश दिवटे यांनी आढावा बैठक घेतली.या बैठकीस मुख्य अभियंता ( पथ ) अनिरूध्द पावसकर , मुख्य अभियंता ( मलनि:सारण) .जगदीश खानोरे , मुख्य अभियंता ( विद्युत )श्रीमती मनिषा शेकटकर, मुख्य अभियंता ( पाणीपुरवठा ) नंदकिशोर जगताप तसेच संबंधित विभागाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता , उप अभियंता व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये सर्व संबंधित विभागांच्या पथ विभागाकडुन दिलेल्या रस्ते खोदाई परवानगीच्या सर्व ठिकाणच्या तसेच प्रमुख रस्त्यावरील ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. काही अपवाद वगळता बहुतांश विभागांचे काम झालेले असून रस्ते पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे , या सर्व खोदलेल्या रस्त्यांचे पर्नपृष्ठीकरण आवश्यकता भासल्यास जास्त मनुष्यबळ वापरून दिनांक ७ जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांनी दिले.
पुर्नपृष्ठीकरण करताना कामे गुणवत्तापूर्वक करण्याबाबत संबंधित म.न.पा. कनिष्ठ अभियंते यांचे प्रशिक्षण आयोजित करावे व त्यांच्या उपस्थितीत हि कामे करून घ्यावी. तसेच त्या कामांची देयके पावसाळा पूर्ण होईपर्यंत अदा करण्यात येऊ नये. आपत्ती निवारण संदर्भातील करावयाची खोदाई आणि कामाच्या संदर्भात पथ विभागाच्या अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय ठेवण्यात येऊन काम करावे अशा सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

