शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

Date:

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन

पुणे, दि. १ : “शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान, कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार बाबाजी काळे, आमदार बापूसाहेब पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, प्र. विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, मराठा चेबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबाणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, दापोली कृषी विद्यापीठाचे डॉ. संजय सावंत, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक संजय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, शेती फक्त शेतकऱ्यांची जबाबदारी नसून उद्योग, शास्त्रज्ञ, शासन आणि समाज यांचे संयुक्त उत्तरदायित्व आहे. शासनामार्फत ॲग्री स्टॅक, डिजिटल क्रॉप सर्व्हे, स्मार्ट सिंचन, कृषी डेटा मिशन, एफ.पी.सी. सक्षमीकरण आणि सेंद्रिय शेती प्रोत्साहन यांसारखे अनेक उपक्रम राबवित आहोत. शेतीमधून शाश्वत उपजीविका निर्माण करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश असून, आत्मनिर्भर महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीची गती वाढविण्यासाठी आपण किती समर्पण भावनेनं काम करतो यावर महाराष्ट्राच्या कृषी विभागाचं भविष्य अवलंबून आहे, असे ते म्हणाले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ॲग्री स्टॅक नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फॉर्मर आयडी (Unique Farmer ID) दिला जात आहे. हा नंबर म्हणजे शेतकऱ्याची ओळख – जशी आपली आधारकार्डवर ओळख असते, तशीच ही शेतीसाठी खास ओळख असेल. या नंबरद्वारे शेतकऱ्याची जमीन, घेतलेली पिके, मिळालेली अनुदानं, विमा, कर्ज याची सर्व माहिती जोडली जाईल. त्यामुळे भविष्यात कुठलीही योजना मिळवण्यासाठी वारंवार कागदपत्रं देण्याची गरज भासणार नाही.

शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर सरळ मदत व योजनांचा लाभ देऊ शकेल. कोणत्याही चुकीच्या नोंदी टाळल्या जातील आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योग्य लाभ पोहोचेल. आजपर्यंत या योजनेत महाराष्ट्रातील १ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करुन आपला नंबर प्राप्त करुन घेतला आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या तलाठी, कृषी सहायक किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन लवकरात लवकर नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणे म्हणजे स्वयंपूर्ण झालो असे नाही. उत्पादनाची गुणवत्ता राखली जाणे, व्यवस्थित त्याची जाहिरात होणे, बाजारपेठ मिळणं आणि त्याला बाजारभाव मिळणे ही मूल्यसाखळी आपल्याला निर्माण करायची आहे.

हवामान बदलामुळे शेतीपुढे खूप आव्हाने आहेत. एका क्षणात शेतीचे प्रचंड नुकसान होते. अशा परिस्थितीत शासन म्हणून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणं, आपला विचार, अभ्यास, प्रत्यक्षात आणणं, त्यातून शेतकऱ्याला ज्ञान देणं ही खरी काळाची गरज आहे.

या ‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’मध्ये सहभागी होणाऱ्या संशोधकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्याची संधी मिळेल. यशस्वी संकल्पनांना वित्तीय आणि तांत्रिक मदतही दिली जाणार आहे. तसेच, खाजगी कंपन्यांच्या सहकार्यानं हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात साकारण्यात येईल, ही बाब महत्वाची आहे. पुणे आंतरराष्ट्रीय ‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’हे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारं ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृषि हॅकॅथॉनच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स आणि कृषितज्ज्ञ यांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे यावेळी म्हणाले, भविष्यात शेती सुरक्षित व संरक्षित कशी करता येईल यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे. तसेच पुढील काळात शेतीसाठी मनुष्यबळाची कमतरता यादृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीची पोत खराब होत असल्याने रासायनिक शेती हळूहळू कमी करुन सेंद्रीय शेतीकडे जाणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेतीतून उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी मार्केट महत्वाचे असून, मार्केट लिंकींग करण्याची आवश्यकता आहे. यासाठी भारतातील कंपन्या पुढाकार घेण्यास तयार आहेत. राज्यात विभागस्तरीय सहा अद्यावत शेती प्रयोगशाळा, शॉपिंग मॉल उभारण्याच्या दृष्टीने कृषी विभाग प्रयत्नशिल आहे. उत्तम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्यास कृषी क्षेत्रात महाराष्ट्र अधिक प्रगतशील होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेती व शेतकरी सक्षम होण्यासाठी शासनामार्फत विविध धोरण राबविण्यात येतील. या कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून शेतीसाठी नवतंत्रज्ञान आत्मसात करुन शेतकऱ्यांनी त्याचा फायदा इतरांनाही होण्यासाठी प्रयत्न करावेत.

कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून नवनवीन माहिती शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. यातूनच सर्वसमावेशक व शेतकऱ्यांच्या फायद्याचे कृषी धोरण राबविण्याचा विचार कृषी विभाग करत आहे, असे त्यांनी सांगितले.

कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, शेतीत उत्पादन जास्त होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत नाही यासाठी नविन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक आहे. या ॲग्री हॅकॅथॉनच्या माध्यमातून शेतमालाच्या उत्पादनासोबत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत हाईल. यावेळी माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलेल्या कृषी विषयक विविध स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध कृषी उत्पादकांकडून माहिती जाणून घेतली.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ॲग्री हॅकॅथॉन आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ, नविन तंत्रज्ञानाची माहिती, शेतीविषयक समस्या व त्यावरील त्रांत्रिक उपाय, पाणी टंचाई, जमीनीचे व्यवस्थान उत्पादनात वाढ या बाबींची माहिती शेतकऱ्यांना ॲग्री हॅकॅथॉन मधून मिळेल. या उपक्रमात १४० जणांची निवड झाली आहे. हे सर्व जण प्रदर्शनात सहभागी होऊन सादरीकरण करणार आहेत. यातून अंतिम १६ जणांची पहिल्या व दुसऱ्या स्थानासाठी निवड होईल. २ व ३ जून रोजी हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, 3 जून रोजी समारोप होईल, असे त्यांनी सांगितले. डॉ. महानंद माने यांनी आभार व्यक्त केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...