पुणे:सात तोळे सोन्याच्या दागिन्यांसह लग्नात १५ लाखाचा खर्च करून देखील सासरकडील मंडळींकडून होणाऱ्या शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.ही घटना फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हरपळे आळी परिसरात घडली असून 6 एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतीक्षा राजेंद्र हरपळे (वय-27) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पती अभिषेक आनंद खळदकर, सासरे आनंद खळदकर, सासू सविता खळदकर, दीर चेतन खळदकर, जाऊ वैभवी खळदकर (रा. सर्व धनकवडी, पुणे) व निर्मला आवटे (पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उषा राजेंद्र हरपळे (वय ४७, रा. हरपळे आळी, फुरसुंगी ता हवेली जि पुणे) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उषा हरपळे या फुरसुंगी परिसरात राहतात. फिर्यादी यांचे पती राजेंद्र हरपळे यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होती. फिर्यादी यांनी शेती करून कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर मुलांना उच्च शिक्षण दिले. उषा हरपळे यांची मुलगी प्रतीक्षा हिचा अभिषेक खळदकर याच्याबरोबर सन 2020 साली विवाह झाला. यावेळी फिर्यादी यांनी सात तोळे सोन्याच्या दागिन्यांसह १५ लाख रुपये खर्च करून विवाह मोठ्या थाटात साजरा केला होता.
प्रतीक्षाच्या विवाहाच्या काही दिवसानंतर पती अभिषेक खळदकर हा हाणमार करू लागला. त्यानंतर सासरकडील मंडळींनी माहेरहून पैसे आन म्हणून तगादा लावला होता. या वारंवार होणाऱ्या शारीरीक व मानसिक त्रासाला प्रतीक्षा कंटाळली होती. भांडणे सोडविण्यासाठी माहेरकडील मंडळी गेली असता, अभिषेक खळदकरच्या नातेवाईकांनी जोरदार भांडणे केली. तसेच प्रतीक्षाला घरात घेतले नाही.
दरम्यान, याप्रकरणी प्रतीक्षाच्या सासरकडील मंडळींच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४९८ अ ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये तक्रार नोंद केली असुन त्याची न्यायालयात सुनावली सुरु आहे. तसेच पोटगीसाठी कौटुंबिक न्यायालयात खटला सुरु आहे. प्रतीक्षाने लग्नात घातलेल्या दागिन्याची मागणी केली असता, पती अभिषेक खळदकर याने नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर फिर्यादी उषा हरपळे यांनी प्रतीक्षाला माहेरी आणले होते.सासरकडील मंडळींनी दिलेल्या त्रासामुळे प्रतीक्षा ही खूप मानसिक तणावाखाली होती. या तणावाखाली तिने टोकाचे पाऊल उचलून राहत्या घरी लोखंडी खुर्चीच्या मदतीने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अशी फिर्याद प्रतीक्षाच्या आईने फुरसुंगी पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यानुसार पतीसह सासरकडील मंडळीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३१६ (२), ३५१ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.
प्रतिक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. या नोटमध्ये, अभिषेककडून माझे सगळे डाग आणि लग्नाचा खर्च घ्या. तस पण इथुन पुढे माझे आयुष्य खराबच झाले. माझ्या नशीबात हेच होते. मी मेल्यावर तरी सुखी होईल असे प्रतिक्षाने लिहिले आहे.

