हवालदिल पालकांचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न
पुणे:
अनाथांच्या माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाने काही भामटे लग्न न होणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत त्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी जनेतला अशा अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
ममता सिंधुताई या प्रकाराची माहिती देताना म्हणाल्या की, माई, पद्मश्री डॉ सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने सोशल मीडियावर खोटे अकाउंट तयार करून, त्यावर लग्नासाठी मुली आहेत अस भासवून, त्यासाठी अमुक एक रक्कमेचा उल्लेख करून आपल्या मुलांसाठी मुलगी शोधत असणाऱ्यांची फसवणूक करणार्याच्या सध्या मी शोधात आहे.
दुसऱ्याच्या गरजांचा फायदा उठवणारे हे जे कोणी आहेत त्यांना कशाचीही भिती का बरे वाटत नसेल?

आम्ही पोलिसांची मदत घेणार
मध्यंतरी मी, दीपक दादा व विनय, आम्ही एक व्हिडिओ करून त्या द्वारे सध्या संस्थेत लग्नासाठी मुली नाहीत हे सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. पण आजच्या समाजाचं चित्रच इतकं विदारक आहे की लग्नासाठी मुलीच मिळत नाहीयेत. त्यामुळे अशा जाहिरातींना लोकं बळी पडताना दिसत आहेत. आम्ही पोलिसांची मदत सुद्धा घेणार आहोतच. पण त्याचबरोबर ठराविक काळाने ह्या पोस्ट सोशल मिडियावर टाकत राहणार आहोत.
ममता पुढे म्हणाल्या, मुळात आजवर आमच्या संस्थामध्ये जितके विवाह पार पडले ते जणू घरातली लेकबाळ सासरी जाते आहे या हेतूनेच तिची रीतसर पाठवणी केली गेली आहे. त्यासाठी आम्ही मुलाकडून एक पैसा घेतलेला नाही. आणि या जाहिराती बघाल तर त्यात पैशाच्या बदल्यात केवळ आमिष दाखवलेलं दिसून येत आहे. आजच्या घडीला माईंच्या कुठल्याही संस्थेत लग्नासाठी मुलीच नाहीयेत. कारण ज्या आहेत त्या आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. त्या त्यांच्या पायावर उभ्या झाल्याशिवाय संस्था त्यांना लग्नासाठी आग्रह करणारच नाही.
अजून किमान तीन वर्षे तरी संस्थेत लग्न नाही. आणि हेच आम्ही दररोज आम्हाला येणाऱ्या फोनवर सांगत असतो. अशा वेळी सुंदर मुलींचे फोटो दाखवून जर लग्नासाठी मुलगी हवी असेल तर आधी गेट पास काढा आणि त्यासाठी पंधरा हजार ऑनलाइन भरा अस सांगणारे विकृतच म्हणू नये तर काय म्हणावं. आधीच समाजातील मुलींची संख्या कमी असताना, नवऱ्या मुलासाठी मुलगी मिळत नसताना अशा हवालदिल आईबापांच्या मनस्थितीचा फायदा उचलणारे किती नीच मानसिकतेचे असतील याची कल्पना न केलेलीच बरी. म्हणूनच ही पोस्ट जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी, असे त्या म्हणाल्या.माईंच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या कृत्यांना वेळीच आळा घातला पाहिजे नाहीतर भोळ्या भाबड्या लोकांची फसवणूक यापुढेही होत राहील. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या आसपास जर कोणी अशा पद्धतीने कुणाची फसवणूक करत असेल तर तो प्रकार लगेच उघडकीस आणा. संस्थेशी संबंधित संपर्क नं आहेत त्यावर कळवा. खात्री करून घ्या. आणि अशा भूलथापांना बळी पडू नका. सोबत स्क्रीनशॉट जोडले आहेत. गेल्या चार दिवसात बऱ्याच ठिकाणाहून मला हे स्क्रीनशॉट आले आहेत. यामध्ये जे मोबाईल नं आहेत त्यावर मी फोन करून झाले आहे. सुरुवातीला मलाही हा सिंधुताई सपकाळांचा महिलाश्रम आहे असं सांगण्यात आलं. जेंव्हा मी त्यांचीच मुलगी बोलते आहेत म्हणाले तेंव्हा फोन कट केलाय. माझ्याकडे ते ही रेकॉर्डिंग आहे, असेही ममता सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

