भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत उदयोन्मुख गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्सहन
पुणे :सान्वी फुंडकर आणि बिपांची बोरठाकूर या पुण्यातील सत्रिय शास्त्रीय नृत्याच्या दोन विद्यार्थिनींची भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सांस्कृतिक स्रोत आणि प्रशिक्षण केन्द्र (सीसीआरटी) तर्फे २०२४–२५ या वर्षासाठी नृत्यशास्त्रातील शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. ही शिष्यवृत्ती देशभरातील कलाक्षेत्रातील उदयोन्मुख गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येते.
सान्वी फुंडकर ही न्यू इंडिया स्कूल, भुसारी कॉलनी, कोथरूड येथील विद्यार्थीनी असून बिपांची बोरठाकूर ही सेंट हेलेनाज स्कूल, सुजी सोराबजी रोड, आगरकर नगर येथील आहे. दोघीही इयत्ता नववीत शिकत आहेत.
नऊ वर्षांपासून डॉ. देविका बोरठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सान्वी व बिपांची सत्रिय नृत्याचे प्रशिक्षण ‘आदि स्कूल ऑफ डान्स’ या संस्थेमध्ये घेत आहेत. या दोघींनी विविध आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन नेपाळ व अबु धाबी अशा ठिकाणी सत्रिय नृत्य सादर करून स्पर्धा जिंकल्या आहेत.
डॉ. देविका बोरठाकूर या ख्यातनाम तज्ञ आणि भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, कोथरूड येथील प्रमुख प्राध्यापिका आहेत. याशिवाय, बिस्मिल्ला खान पुरस्कारप्राप्त गुरु नरेनचंद्र बरुआ आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेती गुरु अनीता शर्मा या दोघींचे मार्गदर्शन आणि विशेष प्रशिक्षण या विद्यार्थिनींना मिळत आहे.
सत्रिय हे भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक असून याची सुरुवात १५व्या शतकात महापुरुष श्रीमंत शंकरदेव यांनी आसाममध्ये केली. हे नृत्य वैष्णव धार्मिक परंपरेशी निगडित असून परंपरेने ‘सत्र’ नावाच्या मठांमध्ये आजही सादर केले जाते. १५ नोव्हेंबर २००० रोजी संगीत नाटक अकादमीने सत्रिय नृत्याला शास्त्रीय नृत्याचा दर्जा दिला आहे.
या परंपरेच्या संवर्धनासाठी आणि महाराष्ट्रात त्याचा प्रसार करण्यासाठी भारती विद्यापीठाचे संचालक शारंगधर साठे यांनी दिलेल्या पाठबळामुळे विद्यापीठात सत्रिय डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू होऊ शकला. त्यामुळे ईशान्य भारताच्या समृद्ध सांस्कृतिक ‘सत्रिय नृत्याच्या’ वारशाचा सन्मान, प्रसार आणि प्रचार महाराष्ट्रात प्रभावीपणे होत आहे.

