नवी मुंबई : तळोजा फेज-१ मधील पेठाली गावात राहणाऱ्या सोनम केणी (वय ३० वर्ष) या महिलेने आपल्या चार वर्षीय मुलीची उशीच्या सहाय्याने हत्या करून नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेची तत्काळ दखल विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून त्यांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची सखोल व सर्वांगीण चौकशी करून तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
सोनम हिच्या आत्महत्येचे खरे कारण समोर येणे अत्यंत गरजेचे असून ही घटना केवळ कौटुंबिक कारणावर आधारित आहे की त्यामागे कोणते सामाजिक, मानसिक अथवा इतर दबाव होते, हे तपासणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. त्यांनी पोलीस प्रशासनाला सूचित केले की, या घटनेची चौकशी करताना तिच्यावर मानसिक, शारीरिक अथवा कौटुंबिक पातळीवर कोणता दबाव होता का, हेही बारकाईने पाहावे. सोनमच्या आत्महत्येस कोणी प्रवृत्त केले असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“मी स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. संबंधित यंत्रणांनी वेळीच कार्यवाही करणे गरजेचे आहे. सोनमच्या आत्महत्येमागे जर कोणी कारणीभूत असेल, तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन महिलांच्या मानसिक आरोग्याची, सुरक्षिततेची व भावनिक गरजांची दखल घ्यायला हवी,” असे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस प्रशासनाला चौकशीस गती देण्याचे तसेच सोनमच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत.

