पुणे, दि. ३० मे २०२५: महावितरणच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे परिमंडलामध्ये दि. १ ते ६ जून दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासोबतच ‘सुरक्षाथॉन’ मॅरेथॉन स्पर्धेचे व ऑनलाइन प्रश्नमंजूषेचे उद्घाटन रविवारी (दि. १ जून) महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते होणार आहे.
बिजलीनगर (चिंचवड) येथील महावितरणच्या उपविभाग कार्यालय परिसरातून ‘रन फॉर इलेक्ट्रिकल सेफ्टी’ मॅरेथॉनने या सप्ताहाला प्रारंभ होत आहे. रविवारी (दि. १) सकाळी ५.३० वाजता तीन किलोमीटर व पाच किलोमीटरच्या मॅरेथॉनला सुरवात होईल व निर्धारित मार्गाने परत त्याच ठिकाणी समाप्त होईल.
महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पुणे परिमंडल अंतर्गत सुमारे ६५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच वीजग्राहक व महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विद्युत सुरक्षेबाबत ऑनलाइन प्रश्नमंजूषेचे उद्घाटन संचालक श्री. पवार यांच्याहस्ते होईल.
महावितरणचे कर्मचारी व सर्व नागरिकांसाठी शून्य विद्युत अपघाताचे ध्येय घेऊन सुरक्षेबाबत जनजागरण सुरू आहे. घरगुती, व्यावसायिक ठिकाणी वापरले जाणारे विविध उपकरणे तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा यापासून कायम सावध व सतर्क राहण्याचा जागर करण्यासाठी विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

